होमिओपॅथिक डाॅक्टरांच्या विराेधात ॲलोपाल्थिक डाॅक्टरांचा संप; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:17 IST2025-09-18T18:16:47+5:302025-09-18T18:17:02+5:30
येथील राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कळवा येथे ठाण्याचे आइएमए जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध जाहीर केला.

होमिओपॅथिक डाॅक्टरांच्या विराेधात ॲलोपाल्थिक डाॅक्टरांचा संप; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
ठाणे : राज्य शासनाने सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) मध्ये स्वतंत्र नोंदणी रजिस्टरामध्ये नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचा ठाणे येथील आइएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन)च्या ॲलोपाल्थिक डॉक्टरांनी जोरदार विरोध केला आहे.
येथील राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कळवा येथे ठाण्याचे आइएमए जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध जाहीर केला. आईएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली या माेर्चेकरांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली आणि शासनाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध मागण्यांचे निवेदन दिले.
या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे शासनाने सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस (होमिओपॅथिक) डॉक्टरांना स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदणीचा आदेश दिला आहे, ज्यामुळे ॲलोपाल्थिक डॉक्टरांना गंभीर धोका असल्याचे आंदाेलनकर्त्या डाॅक्टरांचे म्हणणे आहे. या डाॅक्टरांनी म्हटले की, हा निर्णय ११ जुलै २०२४ रोजी शासनाने जारी केलेल्या परिपत्रकाच्या आणि हा विषय सध्या माननीय मुंबई उच्च न्यायालयात अनसुलित राहिल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेला, कायद्यास विरोधी आणि न्यायालयाचा अवमान करणारा आहे. असेही या डाॅक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये डाॅक्टरांनी विविध मागण्या केल्या. त्यामध्ये आयएमएच्या म्हणण्यानुसार या निर्णयाने रुग्णांच्या सुरक्षिततेस मोठा धोका निर्माण होईल. आधुनिक वैद्यकीय शिक्षण व व्यावसायिक दर्जा घसरू शकतो. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन होईल. अपूर्ण प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर रुग्णांवर उपचार करणे हे जीवाशी खेळण्यासारखे आहे, आदी मागण्या या आंदाेलनकर्त्या डाॅक्टरांकडून करण्यात आल्या आहेत.