मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:07 IST2025-09-22T17:05:23+5:302025-09-22T17:07:39+5:30
Devendra Fadnavis Thane Metro: गायमुख जंक्शन ते विजय गार्डन मार्गिकेची तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची आजपासून सुरूवात

मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis Thane Metro: मेट्रो ४ आणि मेट्रो ४ अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो ११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ही ५८ किमी लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. मेट्रो मार्ग 4 (वडाळा–कासारवडवली) व 4 अ (कासारवडवली–गायमुख) च्या टप्पा-१ गायमुख जंक्शन गायमुख गाव- घोडबंदर रोड- कासारवडवली- विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेट्रो मार्गाबद्दल बोलताना म्हणाले, "घाटकोपर-मुलुंड -गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून मेट्रो ४ ची ३२ कि.मी. आणि मेट्रो ४ अ ची २.८८ कि.मी. आहे. मार्गिकेत एकूण ३२ स्थानके असून या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो ४, मेट्रो ४ अ, मेट्रो १० आणि मेट्रो ११ या सर्व मेट्रोसाठी डेपो तयार करण्याकरिता भोगरपाडा येथे ४५ हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे."
"या मेट्रो मार्गिकेचा विशेष फायदा आहे. पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असणार आहे. पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो ११ ला जाडली जाणार आहे. त्यामुळे ही ५८ किमी लांबीची देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका निर्माण होणार आहे. या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरु झाल्यावर यामध्ये १३ लाखापेक्षा जास्त दैनंदिन प्रवासी प्रवास करतील. या मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे टप्प्याटप्प्याने सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले झाले पाहिजेत असा प्रयत्न आहे", असे मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितले.