स्कूलबसबाबत जबाबदारी झटकल्यास कारवाईचा इशारा; वाहतूक शाखेचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 06:22 IST2019-10-30T22:51:15+5:302019-10-31T06:22:03+5:30
शाळा व्यवस्थापनाने गांभीर्याने घ्यावे

स्कूलबसबाबत जबाबदारी झटकल्यास कारवाईचा इशारा; वाहतूक शाखेचे पत्र
मीरा रोड : मीरा- भाईंदरमधील शाळा व्यवस्थापनांना वाहतूक पोलिसांनी पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने शाळेच्या बस सुस्थितीत ठेवण्यासह आवश्यक त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यास सांगितले आहे. पत्राची गांभीर्याने दखल घेण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी शाळेची बस धोकादायक अवस्थेत चालवली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने दिले होते. या शाळेच्या बसची मागची काच नसतानाही विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती. या मुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने पालकांसह शहरातील नागरिकांमध्ये अशा बेजबाबदार शाळा व्यवस्थापनां विरोधात संताप व्यक्त होत होता. वाहतूक पोलिसांनीही या बसवर दंडात्मक कारवाई करुन हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. त्या नंतर व्यवस्थापनाने बसची मागची काच तातडीने लाऊन घेतली होती.
या घटनेची वरिष्ठांपासून गंभीर दखल घेण्यात आल्यानंतर वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी शहरातील सर्वच शाळा व्यवस्थापनांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यास बजावले. शाळेतील सर्व बस सुस्थितीत ठेवण्यात याव्यात, बसचालक आणि केअर टेकर यांनी वाहन चालवताना, मुलांना वाहनातून उतरवताना व चढवताना त्यांची विशेष काळजी घ्यावी, शाळेची बस चालवताना सिग्नल तोडू नये, सीट बेल्ट लावणे, वेगाने वाहन चालवू नये व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे शाळा व्यवस्थापनांना बजावले आहे. बसचालकाचे चारित्र्य पडताळणी करून त्याचे प्रमाणपत्र घेण्यात यावेत. चालकाचा परवाना, बॅच, बसची आवश्यक सर्व कागदपत्रे आदींची पडताळणी करून मगच वाहनचालक आणि केअर टेकरची नेमणूक करावी असे शाळांना कळवण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेणार नाही. शाळांनी नियमांचे काटेकोर पालन करून आपली जबाबदारी टाळली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पवार यांनी दिला आहे.