अंबरनाथच्या एमपीएससी, यूपीएससी ट्रेनिंग सेंटरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची दारू पार्टी; 20 दिवसांनी व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:28 IST2022-03-17T12:59:40+5:302022-03-17T13:28:01+5:30
हा सर्व प्रकार 28 फेब्रुवारी रोजी घडला असून त्याची व्हिडिओ क्लिप पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र पंधरा दिवस उलटल्यानंतर देखील या कर्मचार्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अंबरनाथच्या एमपीएससी, यूपीएससी ट्रेनिंग सेंटरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची दारू पार्टी; 20 दिवसांनी व्हिडीओ व्हायरल
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या यूपीएससी ट्रेनिंग सेंटर मध्ये पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची दारूपार्टी रंगल्याची बाब समोर आली आहे. याच यूपीएससी सेंटरमध्ये कोरोना काळात कोविड रुग्णालय उभारण्यात आले होते. त्याच ठिकाणी ही ओली पार्टी रंगल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने पूर्व भागात शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समोरच एमपीएससी आणि यूपीएससी ट्रेनिंग सेंटर उभारले आहे. या प्रशस्त इमारतीत कोरोना काळात रुग्णालय सुरू करून अनेक रुग्णांचे जीव वाचवण्याचे काम करण्यात आले. याच यूपीएससी सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी चक्क लायब्ररीसाठी राखीव असलेल्या खोलीत दारूची पार्टी केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक ही इमारत कशा स्वरूपाने बनवण्यात आली आहे ते पाहण्यासाठी अंबरनाथ मध्ये आलेले असताना ती इमारत दाखवण्यासाठी स्थानिक नगरसेवक सुभाष साळुंके हे गेले असता त्याठिकाणी ओली पार्टी सुरू असल्याची बाब समोर आली.
अंबरनाथच्या एमपीएससी, यूपीएससी ट्रेनिंग सेंटरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची दारू पार्टी pic.twitter.com/SQXrwk4eTp
— Lokmat (@lokmat) March 17, 2022
हा सर्व प्रकार 28 फेब्रुवारी रोजी घडला असून त्याची व्हिडिओ क्लिप पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र पंधरा दिवस उलटल्यानंतर देखील या कर्मचार्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एवढा गंभीर प्रकार घडलेला असताना देखील कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम अधिकारी का करीत आहे,हा प्रश्न उपस्थित होत आहे.