लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : मागील दोन वर्षांत विविध आंदोलने करून नेहमी चर्चेत राहिलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांना आंदोलन महागात पडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला फाशी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध आंदोलने करूनही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ देशमुख यांच्यावर कधीच आली नव्हती. मात्र, या आंदोलनामुळे त्यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बदलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही वर्धापन दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करत देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला स्कायवॉकवर फाशी देत आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी सक्षम प्राधिकरणाकडून घेण्यात आलेली नव्हती. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघनही या वेळी झाले. पोलीस हवालदार दत्तात्रेय वाघ यांच्या तक्र ारीवरून मुंबई पोलीस कायद्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष देशमुख आणि त्यांचे २५ ते ३० कार्यकर्ते यांच्याविरुद्ध बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. - या आंदोलनावर बदलापूर शहर भाजपाचे नेते प्रचंड संतापले होते. मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दिलेली फाशी हे हीन दर्जाचे आंदोलन असून याचा बदलापूर शहर भाजपाच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे भाजपा शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.
सरकारविरोधातील आंदोलन महागात पडले
By admin | Updated: June 13, 2017 03:17 IST