वय वर्षे १२४! ठाण्याचे मनोरुग्णालय होणार आता ‘मॉडर्न’; ३,२७८ बेडची व्यवस्था, अद्ययावत किचन आणि २४×७ कॅन्टीन सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:35 IST2025-12-05T10:34:01+5:302025-12-05T10:35:38+5:30
Thane Mental Hospital News: पर्यावरण ना-हरकत दाखला आणि बांधकाम पूर्वपरवानगी ही आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.

वय वर्षे १२४! ठाण्याचे मनोरुग्णालय होणार आता ‘मॉडर्न’; ३,२७८ बेडची व्यवस्था, अद्ययावत किचन आणि २४×७ कॅन्टीन सुविधा
ठाणे : १२४ वर्षांची परंपरा असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचा प्रथमच कायापालट हाेत आहे. आधुनिक आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात ४० ते ४५ जुन्या इमारती पाडण्याची योजना असून, त्यापैकी २५ इमारतींचे पाडकाम पूर्ण झाले आहे. पाडण्यात आलेल्या इमारतींत पुरुष मनोरुग्णांसाठीचे वॉर्ड, कर्मचारी-अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने यांचा समावेश आहे. मात्र, या सर्वांसह रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी ठिकाणी स्थलांतरासाठी जागेचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पाडकाम थांबविण्यात आले आहे.
पर्यावरण ना-हरकत दाखला आणि बांधकाम पूर्वपरवानगी ही आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. तांत्रिक नियोजन सार्वजनिक बांधकाम विभाग, वास्तुविशारदांकडून तपासले जात आहे. ९ फेब्रुवारीपूर्वी भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पहिले मॉडर्न मनोरुग्णालय नव्या पायाभरणीद्वारे ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची रचना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस यांच्या धर्तीवर केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ५६० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
रुग्ण, नातेवाइकांसाठी आधुनिक सोयी
या नव्या आराखड्यात फॅमिली रूम, म्हणजेच रुग्णासोबत त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला राहण्यासाठी सोय केली जाणार आहे. तसेच हाफ-वे होम सुविधा असेल, ज्यामध्ये रुग्ण बरा झाल्यानंतर घरी जाण्यापूर्वी स्वावलंबन आणि सामाजिक समन्वयाचे प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय सेंटर ऑफ एक्सलन्स, विविध व्यसनमुक्ती केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग, बाल-मानसोपचार विभाग, अद्ययावत किचन आणि २४×७ उपलब्ध कॅन्टीन सुविधा असणार आहे.
३,२७८ बेडची व्यवस्था
रुग्णालयातील क्षमता देखील मोठ्या प्रमाणात वाढणार असून, सध्याच्या १,८५० बेडऐवजी ३,२७८ बेडची व्यवस्था होईल. तसेच राज्यात प्रथमच मेंदूविकार विभाग स्थापन केला जाईल. ज्यामुळे रुग्णांना उपचारासाठी पुढे इतर रुग्णालयात पाठवावे लागणार नाही.