अखेर भूखंड पालिकेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:53 IST2017-08-03T01:53:02+5:302017-08-03T01:53:02+5:30
महापालिकेने परिवहनच्या बस आगारासाठी दिलेल्या भूखंडावर कंत्राटदाराने कब्जा मिळवला होता. महापालिकेने न्यायालयीन लढाई जिंकली असून सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने भूखंडावर पालिकेचा नामफलक लावला आहे.

अखेर भूखंड पालिकेकडे
उल्हासनगर : महापालिकेने परिवहनच्या बस आगारासाठी दिलेल्या भूखंडावर कंत्राटदाराने कब्जा मिळवला होता. महापालिकेने न्यायालयीन लढाई जिंकली असून सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने भूखंडावर पालिकेचा नामफलक लावला आहे.
उल्हासनगर महापालिकेत ११ वर्षापूर्वी शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर कंत्राटदाराकडून परिवहन सेवा सुरू केली. ही सेवा सुरू करताना कंत्राटदाराने बस उभ्या करण्यासाठी व आगराकरिता भूखंडाची मागणी केली होती. महासभेत ठराव करून कॅम्प नं-५ येथील हिंदू स्मशानभूमीजवळील भूखंड कंत्राटदाराला तात्पुरता वापरण्यासाठी दिला. कंत्राटदाराने विनापरवाना भूखंड विकसित केला. तसेच येथूनच बस सुटत होत्या. सुरूवातीला परिवहन सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यान, तिकीट दरवाढीवरून पालिका व कंत्राटदारात वाद झाला.
महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही तिकीट दरवाढीला मंजुरी दिली नाही. या निषेधार्थ कंत्राटदाराने परिवहन सेवा टप्याटप्याने बंद केली. सेवा बंद केल्यानंतर भूखंड पालिकेला हस्तांतरीत करायला हवा होता. मात्र कंत्राटदाराने भूखंडावर दावा सांगून न्यायालयात गेला. पालिका निवडणुकीनंतर तत्कालिन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या आदेशानुसार भूखंडावरील विनापरवाना बांधलेले बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तसेच भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. अखेर पालिका जिंकली असून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त शिंपी यांच्या पथकाने परिवहनच्या भूखंडावर बुधवारी दुपारी नामफलक लावला.