स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनी गाव पंच मंडळावर गाव पाटील ऐवजी झाल्या गाव पाटलीण

By धीरज परब | Updated: August 14, 2025 23:09 IST2025-08-14T23:08:50+5:302025-08-14T23:09:14+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली. पण ह्या वेळचा स्वातंत्र्य दिन मीरा भाईंदर आणि धारावी बेटा वरील ग्रामस्थांसाठी दिशा देणारा ठरला.

After 78 years of independence, the village panch mandal has been replaced by village patil and has become village patlin. | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनी गाव पंच मंडळावर गाव पाटील ऐवजी झाल्या गाव पाटलीण

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनी गाव पंच मंडळावर गाव पाटील ऐवजी झाल्या गाव पाटलीण

लोकमत न्यूज नेटवर्क 
धीरज परब / मीरारोड-
देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली. पण ह्या वेळचा स्वातंत्र्य दिन मीरा भाईंदर आणि धारावी बेटा वरील ग्रामस्थांसाठी दिशा देणारा ठरला. महापालिका झाली असली तरी आजही पूर्वीच्या गावा गावात गाव पंच मंडळ आणि गाव पाटील संकल्पना कायम आहे. आता पर्यंत गाव पाटील होत आले आहेत. पण भाईंदरच्या डोंगरी गाव पंच मंडळा वर यंदा पहिल्यांदाच गाव पाटलीण म्हणून ज्युली मॅक्सी नुनीस ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

मीरा भाईंदर हि आज महापालिका तसेच झपाट्याने लोकवस्ती वाढणारे शहर असले तरी येथील उत्तन, डोंगरी, पाली, चौक, तारोडी, मोरवा, राई, मुर्धा, भाईंदर, नवघर, गोडदेव, मिरा, काशी, घोडबंदर, चेणे, काजूपाडा आदी पूर्वीची गावे व अनेक पिढयां पासून ग्रामस्थ आपले गावपण आणि गावाची पूर्वी पासून चालत आलेली व्यवस्था टिकवून आहेत. आजही येथील अनेक गावां मध्ये गाव पंच मंडळांचा कारभार चालत आहे. अनेक गाव पंच मंडळे हि नोंदणीकृत केली आहेत. 

गावातील कौटुंबिक वाद, गावातील आपसातले तंटे, सामाजिक विषय, ग्रामस्थावर आलेली प्रशासकीय अडचण, गावातील समस्या व सोयी सुविधा आदींसाठी हि गाव पंच मंडळं काम करत आली आहेत. गाव पंच मंडळ अध्यक्षास गाव पाटील म्हटले जाते. आता पर्यंत ह्या गाव मंडळाच्या अध्यक्ष पदी गाव पाटील म्हणून पुरुषच होत आले आहेत. काही गाव मंडळां मध्ये महिला सदस्य घेतल्या जातात. मात्र गाव पाटील वा अध्यक्ष म्हणून कधी महिलेला स्थान दिलेले नाही. 

यंदा मात्र भाईंदरच्या डोंगरी येथील गाव पंच मंडळाच्या अध्यक्ष अर्थात गाव पाटलीण म्हणून ज्युली मॅक्सी नुनीस ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. मीरा भाईंदर सह धारावी बेटा वरील गाव पंच मंडळाच्या अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच एका महिलेस हा सन्मान मिळाला आहे. आता गाव पाटलीण म्हणून ज्युली ह्या गावाचा कारभार हाकणार आहेत. 

मात्र डोंगरी गावातील अंतर्गत राजकारण वा गटबाजी पाहता गावची अध्यक्ष महिला व्हावी ह्या साठी काहींचा सुरवातीला विरोध देखील झाला हे देखील वास्तव नाकारता येणार नाही. १८ जणांच्या गाव मंडळात ज्युली ह्या अध्यक्ष तर उपाध्यक्ष पदी गिल्बर्ट बोर्जीस, सचिव म्हणून क्लेटस नूनीस, सह सचिव म्हणून लिली मेंडोन्सा तर खजिनदार पदी सिल्वेस्टर मेंडोन्सा यांची निवड झाली आहे. 

मूळच्या डोंगरी गावच्या असलेल्या ज्युली ह्या ६ वर्ष पेरिश कौन्सिल मध्ये कार्यरत होत्या. तर गेली ५ वर्ष त्या गाव पंच मंडळाच्या उपाध्यक्षा होत्या. त्यामुळे त्यांना गावच्या नागरी समस्याच नव्हे तर कौटुंबिक, गावातील तसेच सामाजिक समस्यांची जाण आहे. एखाद्याच्या निधना नंतर होणारी ७ व्याची आणि महिन्याची प्रार्थना ह्या साठी मोठ्या संख्येने लोकं यायची. त्यावेळी नाश्ता, चहा आदींचा खर्च अनेक सामान्य कुटुंबियांना शक्य नसला तरी करावा लागायचा. ज्युली व विभागातील महिलांनी मिळून केवळ ७ व्याच्या प्रार्थनेस प्राधान्य दिले आणि महिन्याची प्रार्थना केवळ घरातल्यांनी करावी अशी भूमिका घेतली. या शिवाय गावातील लहान - मोठ्या समस्या, सामाजिक विषयांसाठी त्या सक्रिय असतात असे त्यांच्या परिचितांनी सांगितले. 

ज्युली नुनीस ( अध्यक्षा - गाव पंच मंडळ, डोंगरी) - नातलग आणि गावातील सर्वानी माझ्यावर विश्वास दाखवला आणि पहिल्यांदा एका महिलेस गाव मंडळाची अध्यक्षा ते देखील बिनविरोध निवडून दिले. पूर्ण गावच माझं कुटुंब असून सर्वाना सोबत घेऊन गावाच्या नागरी, सामाजिक, कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी आणि ग्रामस्थांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पती मॅक्सी व मुलांनी देखील खूप प्रोत्साहन दिले.

Web Title: After 78 years of independence, the village panch mandal has been replaced by village patil and has become village patlin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.