मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश ‘लॉक’; विद्यार्थी मनपसंत महाविद्यालयापासून राहणार वंचित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:30 IST2025-08-01T11:30:23+5:302025-08-01T11:30:23+5:30
ऑनलाइन प्रवेश बंधनकारक केल्याने पंचाईत

मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश ‘लॉक’; विद्यार्थी मनपसंत महाविद्यालयापासून राहणार वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६मधील ११वीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत अनुदानित आणि विनानुदानित महाविद्यालयांमधील व्यवस्थापन कोट्याच्या प्रवेशांवर टाच आली आहे. नव्याने लागू केलेल्या क्लिष्ट प्रणालीमुळे पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी कोट्यातून प्रवेश घेण्यात अयशस्वी ठरत असून, महाविद्यालयांच्या हातात आता काहीच राहिलेले नाही.
पूर्वी व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश थेट महाविद्यालयस्तरावर दिले जात होते. पालक विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार प्रवेश घेत होते. मात्र, यंदाच्या नव्या प्रक्रियेनुसार व्यवस्थापन कोट्याची नावे आधीच ऑनलाइन देणे बंधनकारक केले आहे. दुसऱ्या फेरीपर्यंत हे प्रवेश पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर उर्वरित जागा थेट प्रणालीकडे समर्पित होतील, अशी माहिती काही महाविद्यालयांनी दिली आहे.
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाल्यामुळे व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश जवळपास थांबले आहेत. यामुळे महाविद्यालयांच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. महाविद्यालयाचा विकास, सुविधा, ॲक्टिव्हीटी, दुरुस्ती आणि विनानुदानित प्राध्यापकांचे वेतन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
पालक, विद्यार्थी संभ्रमात
महाविद्यालयांना वेठीस धरू नका, कोटा हा संस्थेचा अधिकार आहे, याची जाणीव शासनाने ठेवावी, अन्यथा महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयांचा विकास गती हरवू शकतो, अशी खंत महाविद्यालयांनी व्यक्त केली.
शिक्षणमंत्र्यांचे वेधले लक्ष
विद्यार्थ्यास व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळतो का, याची चौकशी करावयाचे, जर त्याच्या इच्छेनुसार प्रवेश मिळत असेल तर तत्काळ मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेऊन टाकायचे. आता नवीन प्रणालीमध्ये तसे करता न आल्याने पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाहीत. पूर्वीप्रमाणे प्रवेश कालावधीतच मॅनेजमेंट कोटा ॲडमिशन चालू करण्याकडे ठाण्यातील महाविद्यालयांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले.
व्यवस्थापन कोट्याचे अधिकार पुन्हा महाविद्यालयांकडे द्या. या कोट्यातून ४५ ते ६५ टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी पसंतीच्या कॉलेजपासून वंचित राहत आहेत. - कमलेश प्रधान, सतीश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालय.
नवीन प्रणालीमुळे अनुदानित विद्यार्थ्यांना विनानुदानित कोट्यात टाकले जाते. पूर्वी मुंबई, कोकण, पुणे हे स्वतंत्र विभाग होते. आता संपूर्ण महाराष्ट्र एकत्र केल्याने गोंधळ वाढला आहे. - सचिन मोरे, केबीपी कॉलेज.
मॅनेजमेंट कोटा अधिकृत असूनदेखील प्रवेश होत नाहीत, त्यात फी वाढवू शकत नाही, संस्थेचा विकास खुंटणार आहे. - डॉ. महेश बेडेकर, जोशी बेडेकर, महाविद्यालय.