लुटमारीतील आरोपीने केले स्वत:च्याच गळयावर काचेच्या तुकडयाने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:04 IST2021-01-29T00:01:03+5:302021-01-29T00:04:56+5:30
मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी लुटमारीच्या गुन्हयात अटक केल्यानंतर तपासासाठी मुंब्रा येथील घरी आणलेल्या कामरान रईस सिद्दीकी (२९) या आरोपीने स्वच्छतागृहात जाऊन स्वत:च्या गळयावर काचेच्या तुकडयाने प्रहार केल्याची घटना नुकतीच घडली.

मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी केली होती अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी लुटमारीच्या गुन्हयात अटक केल्यानंतर तपासासाठी मुंब्रा येथील घरी आणलेल्या कामरान रईस सिद्दीकी (२९) या आरोपीने स्वच्छतागृहात जाऊन स्वत:च्या गळयावर काचेच्या तुकडयाने प्रहार केल्याची घटना नुकतीच घडली. त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामरान याला पायधुनी पोलिसांनी एका लुटमारीच्या गुन्हयात मुंबईतून अटक केली होती. पायधुनी पोलीस ठाण्याचे गुन्हा प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी २४ जानेवारी रोजी दुपारी १वाजण्याच्या सुमारास त्याला तपासासाठी मुंब्रा येथील त्याच्या घरी नेले होते. याच संदर्भात घरात झडती आणि चौकशी सुरु असतांना लघुशंकेला जाण्याचा बहाणा करीत तो घरातील स्वच्छतागृहामध्ये गेला. त्याने आतून दार बंद केले होते. बराच वेळ होऊनही कामरान बाहेर न आल्यामुळे पायधुनी पोलिसांच्या पथकाने त्याला आवाज दिला. आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी त्याच्या स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडला. तेंव्हा तो आत जखमी अस्वस्थेमध्ये पडलेला आढळला. त्याच्या गळयाभोवती कापल्याच्या गंभीर जखमा होत्या. पोलिसांनी तातडीने त्याला एका खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कामरान विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
* कामरान याने त्याच्या एका साथीदारासह जबरी चोरीचा बनाव केला होता. याच लुटीतील रक्कम त्याच्या घरातून जप्त करण्यासासाठी मुंबई पोलीस त्याच्यासह घरी गेले होते. आता या सर्व प्रकारातून कुटूंबीयांना नाहक त्रास होईल, म्हणून आपण हे कृत्य केल्याचे कामरान याने मुंब्रा पोलिसांना सांगितले.