रिक्षा व दुचाकी चोरी करुन घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, ४ गुन्ह्यांची उकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:37 IST2025-01-02T18:37:17+5:302025-01-02T18:37:56+5:30
आरोपीने वसई, मुंबई, अंधेरी या परिसरात चोऱ्या केल्याचे तपासात सांगितले आहे.

रिक्षा व दुचाकी चोरी करुन घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, ४ गुन्ह्यांची उकल
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- रिक्षा व दुचाकी चोरी करुन घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून ४ गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेला २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि योगिता बाविस्कर यांनी गुरुवारी दिली आहे.
संतोष भवनच्या गवराई नाका येथील शारदा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या योगेंद्र यादव (५२) यांची २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली होती. त्यांनी २२ डिसेंबरला रात्री अपार्टमेंटमध्ये दुचाकी पार्किंग केली होती. चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याने पेल्हार पोलिसांनी २५ डिसेंबरला वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या घटनास्थळी पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन घटनास्थळ परिसर ते मिरारोड असे एकूण ६० ते ७० ठिकाणचे सीसीटी फुटेज तपासले.
बातमीदार तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे इसम नाम साबिरअली शेख उर्फ फत्ते (२८) याला सदर गुन्ह्यात चोरी केलेल्या २ रिक्षा व १ दुचाकीसह ताब्यात घेतले. नंतर त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून सॅमसंग आणि रेडमी कंपनीचे २ मोबाईल मिळून आले. आरोपीकडे चौकशी व तपास केल्यावर गुन्ह्यात चोरी केलेला २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून चार गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीच्या ताब्यात मिळून आलेल्या मोबाईलची माहिती घेतल्यावर त्याने त्याचे साथीदाराने मिळून दोन्ही मोबाईल अंधेरी येथील कॅफे शॉपमधून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हा सराईत असून मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ८ गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. आरोपीने वसई, मुंबई, अंधेरी या परिसरात चोऱ्या केल्याचे तपासात सांगितले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दुर्गा चौधरी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि रमेश वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, रवि वानखेडे, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अभिजित नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, वसीम शेख यांनी केली आहे.