ठाण्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:08 IST2020-02-17T23:04:21+5:302020-02-17T23:08:58+5:30
ठाण्यातील रुपादेवी पाडा क्रमांक दोन येथील एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या सागर सुरेश देठे (२४) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने कर्जत (जि. रायगड) येथून नुकतीच अटक केली आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शोध पथकाने केली कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वागळे इस्टेट रुपादेवी पाडा क्रमांक दोन येथील एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या सागर सुरेश देठे (२४, रा. शिवनेरी चाळ,इंदिरानगर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने कर्जत (जि. रायगड) येथून शनिवारी अटक केली आहे. त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
रुपादेवी पाडा क्रमांक दोन परिसरात राहणारी ही पिडित मुलगी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती संपूर्ण दिवसभरात घरी न परतल्यामुळे तिच्या अपहरणाची तक्रार तिच्या पालकांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तिचा श्रीनगर पोलिसांंबरोबरच गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांचे पथकही शोध घेत होते. रुपादेवी पाडयातील सागर याने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची माहिती होनराव यांच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कर्जत येथून अटक केली. तिच्या इच्छेविरुद्ध त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचेही तपासात उघड झाले. तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत असून श्रीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी. डी. कोपरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.