लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत मार्गावरील तीन, चारपदरी लोहमार्ग व त्यातही कल्याण ते आसनगाव आणि कल्याण ते बदलापूर हा प्रस्तावित चारपदरी लोहमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. तसेच कल्याण ते मुरबाड या नवीन मार्गाचा विकास आराखडा लवकर तयार करावा, आदी मागण्यांसाठी भिवंडीचे खा. कपिल पाटील यांनी मुंबईत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष संजीव मित्तल यांची सोमवारी भेट घेतली.
यावेळी भिवंडी मतदारसंघात कोणकोणत्या ठिकाणी रेल्वेस्थानकांचा विचार केला आहे, याची माहिती मिळावी, अशी विनंती खा. पाटील यांनी केली. आसनगाव येथील उड्डाणपुलाचा प्रश्न तसेच प्रलंबित मुद्द्यांवरही चर्चा झाली. महाव्यवस्थापक व उपस्थित अधिकाऱ्यांनी पाटील यांच्या सूचनांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित यंत्रणांशी चर्चा, विनिमय करून लवकर आवश्यक ते बदल करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले.
यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मनोज शर्मा, अश्वनी सक्सेना, मनजित सिंग, मुकुल जैन, दिनेश वशिष्ठ, विजय नथावट, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलाभ गोयल आदी उपस्थित होते.
---------