ठाण्यात ५० ठिकाणी होणार ‘आपला दवाखाना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:39 IST2019-06-13T00:38:32+5:302019-06-13T00:39:20+5:30
ठामपाचा निर्णय : वार्षिक २८ कोटींचा खर्च अपेक्षित

ठाण्यात ५० ठिकाणी होणार ‘आपला दवाखाना’
ठाणे : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाण्यातही महापालिकेच्या माध्यमातून आपला दवाखाना ही संकल्पना आकार घेत आहे. त्यानुसार पहिल्या दोन दवाखान्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शहराच्या विविध भागात एकूण ५० आपला दवाखाना ( ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभिव्यक्ती स्वारस्यानुसार हे क्लिनिक चालविले जाणार असून त्याठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. याशिवाय रक्त तपासणी, शुगर, ईसीजी आदींसारख्या चाचण्यासुद्धा मोफत केल्या जाणार आहेत.
या उपक्रमासाठी होणारा खर्च हा पालिका करणार असल्याने रुग्णांना मोफत उपचाराची संधी, तीही त्यांच्या घराजवळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर वार्षिक २८ कोटींचा बोजा पडणार आहे. ठाणे शहराची लोकसंख्या ही आजघडीला २६ लाखांच्या घरात आहे. त्यातील ५२ टक्के लोक हे झोपडपट्टी आणि चाळीत वास्तव्यास आहेत. या नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि महापालिकेची २७ आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अपुरी ठरत आहे. त्यामुळे झोपडपट्टी अथवा चाळीतील प्रत्येक नागरिकाला पालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी पालिकेने दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाण्यात आपला दवाखाना ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार याचा पहिला प्रयोग शिवाजीनगर आणि खारेगाव या भागात केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता संपूर्ण शहरात या स्वरुपाचे ५० दवाखाने सुरू करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव १९ जूनच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. या प्रस्तावानुसार दवाखाना उभारणीचा खर्च, त्याठिकाणी लागणारी उपकरणे, साहित्य आणि जागा भाड्याने घेणे, हा खर्च संबंधित संस्थेला करावा लागणार आहे.
दररोज १०० रुग्णांची होणार तपासणी
‘आपला दवाखाना’ सुरू करायचा असेल तर त्याच्या निर्मितीसाठी ४३ लाख ४७ हजार रु पये खर्च अपेक्षित असून हा सर्व खर्च नियुक्त संस्थेमार्फत केला जाणार आहे.
या दवाखान्यात येणाºया रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी आणि औषधांचा खर्च महापालिका करणार असून त्यासाठी महापालिकेवर वर्षाकाठी २८ कोटी २३ लाख ६० हजार इतका भार पडणार आहे.
दररोज शंभर
रु ग्ण तपासणीसाठी येतील, असे ग्राह्य धरून खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे.