दारूच्या नशेत माेटारसायकल चालविणाऱ्या तरुणाला एक महिन्याचा कारावास, १५ हजारांचा दंड भरण्यास नकार
By जितेंद्र कालेकर | Updated: October 8, 2025 22:36 IST2025-10-08T22:36:01+5:302025-10-08T22:36:14+5:30
Thane Crime News: दारूच्या नशेत माेटार सायकल चालविणाऱ्या स्वप्निल दशरथ निघोट (वय २४, रा. नवी मुंबई) याला ३० दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली आहे.

दारूच्या नशेत माेटारसायकल चालविणाऱ्या तरुणाला एक महिन्याचा कारावास, १५ हजारांचा दंड भरण्यास नकार
- जितेंद्र कालेकर
ठाणे - दारूच्या नशेत माेटार सायकल चालविणाऱ्या स्वप्निल दशरथ निघोट (वय २४, रा. नवी मुंबई) याला ३० दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठाणेन्यायालयाने सुनावली आहे. मद्य प्राशन केल्याप्रकरणी दहा हजारांचा आणि विना लायसन माेटारसायकल चालविल्याप्रकरणी पाच हजार अशा १५ हजारांचा दंड त्याला न्यायालयाने केला हाेता. हा दंड त्याने न भरल्याने त्याला ही शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेने बुधवारी दिली. त्याची आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
निघाेट हा ३ ऑक्टाेबर राेजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईतून ठाण्याकडे येत असतांना तीन हात नाका येथे त्याला नाैपाडा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विना हेल्मेट असल्याने अडविले. त्याचवेळी त्याने मद्य प्राशन केल्याचेही आढळले. त्याच्याविरुद्ध याप्रकरणी मोटार वाहन कायदा कलम १८५ (दारू पिऊन वाहन चालविणे) तसेच कलम ३(१) १८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याला ७ ऑक्टाेबर राेजी ठाणे न्यायालयाने १५ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास ३० दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यामुळे त्याची आता ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. दाखल करण्यात आले आहे.
दारू पिऊन वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अपघात आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक शाखेचे पाेलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.