बहिणीला मेसेज पाठविल्याच्या रागातून तरुणावर चाकूने हल्ला, नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By जितेंद्र कालेकर | Updated: May 13, 2024 23:18 IST2024-05-13T23:15:53+5:302024-05-13T23:18:44+5:30
याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.

बहिणीला मेसेज पाठविल्याच्या रागातून तरुणावर चाकूने हल्ला, नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे : बहिणीला मेसेज पाठविल्याच्या संशयातून ऋषिकेश चाचरे (२५, रा. पाचपाखाडी, ठाणे) याच्यावर २५ वर्षीय तरुणाने चाकूने वार केल्याची घटना घडली. यात मध्यस्थी करणाऱ्या ऋषिकेश याच्या मैत्रिणीच्या उजव्या हातावर वार करून तिलाही गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.
ठाण्यातील पाचपाखाडी भागातील आनंद सावली गृहसंकुलातील त्याच्या घरी ११ मे २०२४ रोजी ऋषिकेश सायंकाळी ४:३० वाजता त्याच्या मैत्रिणींसह होता. त्याचदरम्यान प्रणील पवार (२०, नावात बदल) आणि गणेश शेट्टी (२५, रा. सावरकरनगर, ठाणे) हे दोघेही त्याच्या घरी गेले. यातील प्रणीलने बहिणीला मेसेज पाठवतो, याचा राग मनात धरून शिवीगाळ करीत गणेशने त्याचे दोन्ही हात समोरून पकडले. त्यानंतर प्रणीलने त्याच्याकडील चाकूने त्याच्या बगलेखाली तसेच, पाठीवर खुपसून गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या प्रकाराने घाबरलेल्या प्रणीलच्या मैत्रिणीने यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
प्रणीलने त्याच्याकडील चाकूने तिच्याही उजव्या हातावर गंभीर दुखापत करून तिला जखमी केले. त्यानंतर तिने आरडाओरडा केल्यानंतर दोघेही हल्लेखोर तिथून फरार झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशला त्याच्या मैत्रिणीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावरही याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.