भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी फरार

By नितीन पंडित | Updated: July 5, 2024 11:53 IST2024-07-05T11:53:14+5:302024-07-05T11:53:30+5:30

शांतीनगर परिसरातील गोविंद नगर येथील एका दुमजली चाळीत एक कुटुंब राहत होते. आई वडील दोन मोठ्या बहिणी व एक भाऊ व सर्वात छोटी पीडिता असे कुटुंब त्याठिकाणी वास्तव्यास  होते.

A nine-year-old girl was raped and killed in Bhiwandi, the accused is absconding | भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी फरार

भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी फरार

भिवंडी: शहरात एका नराधमाने नऊ वर्षाच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी समोर आली आहे.घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

शहरातील शांतीनगर परिसरातील गोविंद नगर येथील एका दुमजली चाळीत एक कुटुंब राहत होते. आई वडील दोन मोठ्या बहिणी व एक भाऊ व सर्वात छोटी पीडिता असे कुटुंब त्याठिकाणी वास्तव्यास  होते. वडील यंत्रमाग कारखान्यात तर आई गोदामात काम करत होती. आई आपल्या दोन्ही मोठ्या मुलींना सुध्दा सोबत कामाला घेऊन जात होती. तर भाऊ शाळेत जात होता. गुरुवारी सुध्दा हे कुटुंब नेहमी प्रमाणे कामाला गेले तर मुलगा दुपारी शाळेत गेला असताना त्यासुमारास त्याच चाळीच्या वरच्या मजल्यावर एकटाच राहणाऱ्या नराधमाने पीडित चिमुरडीस खाऊचे आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले.

मुलीने आपली खोली कुलूप लाऊन बंद केली व ती त्या नराधमाच्या खोलीत गेल्यावर तेथे नराधमाने तिच्यावर अत्याचार करून धारदार वस्तूने वार करून तिची हत्या केली.सायंकाळी शाळेतून भाऊ घरी आला ,खोलीला कुलूप बघून त्याने बहिणीला शोधले पण ती सापडली नाही. त्यानंतर आई व मोठ्या बहिणी कामावरून घरी परतल्या. त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली असता परिसरातील एका छोट्या मुलाने पीडित मुलीला वरच्या मजल्या वरील खोलीत जाताना बघितल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला असता बाहेरून कडी लावलेल्या एका खोलीत पीडितेचा मृतदेह  रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसून आला.हे दृश्य पाहिल्यावर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.

या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस ठाण्याचा फौजफाटा परिसरात दाखल होत त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयात रवाना केला.पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून मृतदेह शास्त्रोक्त उत्तरीय तपासणी साठी मुंबई जे जे रुग्णालयात पाठवला आहे. तर पोलिस सूत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरातून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: A nine-year-old girl was raped and killed in Bhiwandi, the accused is absconding