ठाण्यात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाख ४० हजारांचा दंड वसूल
By अजित मांडके | Updated: November 9, 2023 20:41 IST2023-11-09T20:41:03+5:302023-11-09T20:41:21+5:30
यांत्रिकी पध्दतीने शहरातील १२० कि.मीच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली.

ठाण्यात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाख ४० हजारांचा दंड वसूल
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता कायम राखली जावी यासाठी सर्व प्रभागसमिती स्तरावर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी भरारी पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी गुरुवारी केलेल्या कारवाईत सायंकाळपर्यत ९३ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण दोन लाख ४० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यात डेब्रीज वाहतूक करणाऱ्या एकूण ३३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. प्रभागसमितीनिहाय नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने ठाणे शहरात बांधकाम सुरू असणाऱ्या ९८ ठिकाणांच पाहणी केली. महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी बायोमास जाळणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यांत्रिकी पध्दतीने शहरातील १२० कि.मीच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली.
हवेच्या प्रदुषणाबाबत शाळांमध्ये जनजागृती
हवा प्रदूषणाबाबत ठाणे महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. शाळांमध्ये फटाके न फोडता दिवाळी साजरी करणे तसेच पर्यावरणपुरक पद्धतीने सण उत्सव साजरा करणे व त्याप्रमाणे आपली जीवनशैली बनविणे याबाबत शपथ , रॅली असे उपक्रम घेण्यात आले. ठाणे शहरात विद्यार्थ्यांमार्फत काढण्यात आलेल्या रॅलीत ठाणे शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.