चिमुरड्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी भिवंडी मनपाच्या बिट निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Updated: December 16, 2022 17:35 IST2022-12-16T17:34:39+5:302022-12-16T17:35:00+5:30
भिवंडी मनपा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

चिमुरड्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी भिवंडी मनपाच्या बिट निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी :
दि.१६- भिवंडी महानगरपालिका हद्दीतील न्यू टावरे कंपाऊंड नारपोली या ठिकाणी असलेल्या शाळेसमोरील स्वागत कमानीवरील संगमरवरी लादी डोक्यात पडून चार वर्षीय चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी स्थानिक प्रभाग समिती क्रमांक चार चे बिट निरीक्षक महेंद्र जाधव यांना दोषी ठरवित त्यांच्याविरुद्ध गुरुवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे भिवंडी मनपा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
३ डिसेंबर रोजी सायंकाळी न्यु टावरे कंपाउंड येथील जयराम टावरे समाजगृहा समोर उभारण्यात आलेली स्वागत कमानीला लावलेली भली मोठी संगमरवरी लादी निखळून पडल्याने झालेल्या दुर्घटनेत त्याठिकाणी खेळत असलेल्या आयुष कुमार शंकर प्रसाद कुशवाह याच्या डोक्यात पडून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला होता.याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाणे येथे सुरवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास करणाऱ्यांच्या चौकशीत सदर कमानीचे देखभाल करण्याची जबाबदारी ही भिवंडी महानगरपालिकेचे बीट निरीक्षक म्हणुन कामकाज पाहत असलेल्या महेंद्र जाधव यांची असल्याने त्याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची देखभाल न करता हलगर्जीपणाचे कृत्य केल्याने आयुष कुशवाह याचे मरणास कारणीभूत झाल्याने सपोनि श्रीरामेश्वर दराडे यांनी दिलेल्या तक्रारी वरून भोईवाडा पोलीस ठाण्यात महेंद्र जाधव या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.