कळव्यातील दर्शन गॅस सर्व्हिस दुकानातून सात लाख २१ हजारांची रोकड चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 21:11 IST2019-07-09T21:06:30+5:302019-07-09T21:11:40+5:30
कळव्यातील दर्शन गॅस सर्व्हिस या दुकानाचे पत्रे उचकटून चोरटयांनी सात लाख २१ हजारांची रोकड चोरल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चोरटयांनी पत्रे उचकटून केला शिरकाव
ठाणे: कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या जवळ असलेल्या दर्शन गॅस सर्व्हिस या दुकानातून चोरटयांनी सात लाख २१ हजारांची रोकड चोरल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात पंकज खारकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
कळव्यातील ठाणे - बेलापूर रोडवर असलेल्या एचपी कंपनीच्या दर्र्शन गॅस सर्व्हिसेस या दुकानाचे पत्रे चोरटयांनी ८ जुलै रोजी पहाटे २.४० ते ३.३० वा. च्या सुमारास उचकटून आत शिरकाव केला. त्यानंतर दुकानाचे लाकडी कपाट आणि ड्रॉवरमधील सात लाख २१ हजार ३०६ रुपयांची रोकड चोरली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात सोमवारी दुकारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यात दोन चोरटे तोंडाला रु माल बांधून चोरी करीत असल्याचे आढळल्याचे पोलिसांनी सांंगितले. या प्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुंन्हा दाखल करण्यात आला आहे. या भामटयांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास कळवा पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.