अरे बापरे, हे काय? ठाण्यात तब्बल ५०९ बांगलादेशींना अटक; कसे मिळवतात आधार कार्ड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:07 IST2025-04-13T16:04:48+5:302025-04-13T16:07:23+5:30
भारतात बेकायदा वास्तव्य, गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग

अरे बापरे, हे काय? ठाण्यात तब्बल ५०९ बांगलादेशींना अटक; कसे मिळवतात आधार कार्ड?
ठाणे : अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील घरात एका बांगलादेशीने हल्ला केल्याची घटना अलीकडेच घडली. त्यानंतर बांगलादेशींवरील कारवाई मुंबई आणि ठाण्यात तीव्र झाली. कारवाईची धार अलीकडेच तीव्र झाली असली तरी गेल्या दहा वर्षांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात तब्बल ५०९ बांगलादेशींवर कारवाई झाली.
ठाण्यातील अनेक बांधकामांच्या ठिकाणी बांगलादेशी पुरुष मजूर म्हणून काम करतात, तर महिला बारमध्ये गायक किंवा वेट्रेस म्हणून काम करतात. काही महिलांनी घर चालविण्यासाठी देहविक्रीचा व्यवसाय पत्करल्याची माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे. महाराष्ट्रात सैफ अली हल्ल्यासारखे आणखी काही धक्कादायक प्रकार निदर्शनास आले. अनेक बांगलादेशी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेही असल्याची बाब पाहण्यात आली. तुलनेत हे मजूर स्वस्त, कुशल तसेच अंगमेहनती असल्यानेही त्यांना कामावर ठेवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांमध्ये चढाओढ लागते. ठाण्याचे खा. नरेश म्हस्के आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या मागणीनंतर केंद्र सरकारने या बांगलादेशींविरुद्धची मोहीम तीव्र केली.
असा शिरकाव…
मेघालय, पश्चिम बंगाल यांच्या सीमेवरील चेक पोस्ट चुकवून ते घुसखोरी करतात. बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड बनवितात. त्यानंतर ते कोलकातामार्गे मुंबई, ठाणे आणि पुणे गाठतात.
कारवाई तीव्र
दहा वर्षातच पोलिसांनी कारवाई केलेल्या बांगलादेशी घुसखोरींची संख्या ५०९ इतकी आहे. सैफ अलीच्या प्रकरणानंतर ठाण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई तीव्र केली. ४३ गुन्हे दाखल झाले असून ८६ जणांना अटक करण्यात आली आहे.