१३ दिवसात १७५६ वाहनचालकांकडून ५ लाख २३ हजारांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 16:04 IST2020-07-15T16:04:31+5:302020-07-15T16:04:47+5:30
९२ जणांनी केले मनाई आदेशाचे उल्लंघन

१३ दिवसात १७५६ वाहनचालकांकडून ५ लाख २३ हजारांचा दंड वसूल
- अनिकेत घमंडी
डोंबिवली: २ ते १४ जुलै दरम्यान पुन्हा घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मनाई आदेश असतांनाही रस्त्यांवर फिरणा-या 1756 वाहनचालकांकडून ५ लाख २३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामध्ये १३७५ दुचाकी, १३९ चार चाकी, २४२ तीन चाकी वाहनांचा समावेश असल्याची माहिती विभागीय पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
कल्याण परिमंडळ पोलीस ठाण्यातील बाजारपेठ, महात्मा फुले, कोळसेवाडी, खडकडपाडा, मानपाडा, रामनगर, विष्णुनगर, टिळकनगर पोलीस ठाण्याचा त्यात समावेश असून सर्वाधिक केसेस या कोळसेवाडी आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सगळयात कमी केसेस टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत.
मास्क न लावणा-या ३७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ९२ जणांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत १० वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीसांवरील हल्लयाच्या घटना शून्य असल्याने त्याबद्दल पानसरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आता पुन्हा 19 जुलै पर्यन्त लॉकडाऊन वाढवला असून कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी गांभीर्य बाळगावे असे आवाहन पानसरे यांनी केले आहे. दुचाकीवर तीन जण बसून जातात, रिक्षेत पाच जण बसतात हे योग्य नाही असेही पोलिसांनी सांगितले.