ठाण्याच्या श्रीनाथ मंदिरात ३९ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:00 IST2018-09-02T21:56:59+5:302018-09-02T22:00:46+5:30
येथील खारकर आळीतील श्रीनाथ मंदिरातून नऊ लाखांच्या रोकडसह ३८ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

नऊ लाखांच्या रोकडचाही समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: येथील खारकर आळीतील गुजराथी बांधवांच्या श्रीनाथ मंदिरातून नऊ लाखांच्या रोकडसह ३८ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. सकाळी मंदिरातील पुजाऱ्याची पत्नी साफसफाईसाठी गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जांभळी नाक्यावर गजबजलेल्या वस्तीमध्ये हे श्रीनाथ मंदिर आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पुजारी परेश पंडीत यांनी मंदिराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चोरटयांनी मंदिराच्या मागच्या बाजूच्या दरवाजाचे लॉक तोडून गाभा-यातील २२ लाख ५० हजारांचे ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने, सात लाखांची २० किलो चांदीची भांडी तसेच नऊ लाखांची रोकड चोरुन नेली. रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पुजा-याची पत्नी मीना पंडीत तिथे साफसफाईसाठी गेल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या निदर्शनास आली. या प्रकाराने बाजारपेठेतील परिसरात एकच खळबळ उडाली असून ठाणेनगर पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिका-यांनीही भेटी देऊन घटनास्थळाची पाहणी केली. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता शोध पथकाकडून या चोरीचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.