मीरारोडमधील डाचकूलपाड्यातील २६ अनधिकृत घरे पाडली, २५ बांधकामांवरही चालणार बुलडोजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 23:24 IST2025-10-30T23:22:56+5:302025-10-30T23:24:06+5:30
मीरा भाईंदर मध्ये महापालिका अधिकारी व नगरसेवक, आमदार आदी लोकप्रतिनिधी आणि राजकारणी यांच्या अभद्र युती मधून प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आली आहेत.

मीरारोडमधील डाचकूलपाड्यातील २६ अनधिकृत घरे पाडली, २५ बांधकामांवरही चालणार बुलडोजर
मीरारोडच्या अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी बनलेल्या आणि नुकत्याच दोन गटातील राड्यावरून धार्मिक वळण देण्याचा खटाटोप झालेल्या डाचकूल पाडा भागातील अनधिकृत बांधकामांवर अखेर महापालिका व पोलिसांनी तोडक कारवाई सुरू केली आहे. नव्याने झालेली २६ बेकायदा बांधकाम तोडली असून आणखी २५ बांधकामे तोडणार आहेत.
मीरा भाईंदर मध्ये महापालिका अधिकारी व नगरसेवक, आमदार आदी लोकप्रतिनिधी आणि राजकारणी यांच्या अभद्र युती मधून प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आली आहेत. अनधिकृत बांधकाम मधून काळी कमाई आणि नंतर त्यात रहायला येणाऱ्या लोकांची वोट कमाई असे समीकरण राजकारणी व प्रशासन यांचे जुळलेले आहे.
त्यातूनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हद्द व लगत काजू पाडा, चेणे, वरसावे, घोडबंदर, काशीगाव, महाजनवाडी भागातील वन हद्द, इको सेन्सिटिव्ह झोन, आदिवासींच्या जमीन व सरकारी व खाजगी जमीन, आरक्षण, ना विकास क्षेत्रात बेफाम अनधिकृत बांधकामे होत आहेत. ह्या बेकायदा बांधकाम ना सुरवाती पासूनच संरक्षण दिले जाते.
नंतर पालिका त्याला कर आकारणी, पाणी, सार्वजनिक शौचालय, दिवाबत्ती, रस्ते - पदपथ आदी सर्व काही सुविधा स्थानिक नगरसेवक, राजकारणी, आमदार आदींच्या बेकायदा मागणी नुसार पुरवते. त्यावर करोडो रुपये खर्च केले जातात. वीज पुरवठा, मतदार यादीत नाव, रेशन कार्ड बनते. बहुतांश सरकारी व खाजगी जागेतील अनधिकृत बांधकामांची बेकायदा विक्री व भाड्याने देऊन मोठे पैसे कमावले जातात.
डाचकूल पाडा हा देखील वन हद्द भागातील बहुतांश आदिवासी जमिनीवर झपाट्याने फोफावलेली झोपडपट्टी. झोपडी माफिया पासून अनेक गुन्हे ह्या भागात वाढीस लागले आहेत. नुकत्याच २१ ऑक्टोबर रोजी येथील रहिवाशी आणि रिक्षाचालक यांच्यातील राडा आणि त्याला धार्मिक वळण देण्याचा खटाटोप मुळे येथील अनधिकृत बांधकामची बजबजपुरी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण, अपर तहसीलदार नीलेश गौड सह संबंधित अधिकारी आदींची नुकतीच बैठक झाली. त्यात येथील अनधिकृत बांधकाम वर कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्या अनुषंगाने महापालिका प्रभाग समिती ६ च्या प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले सह पालिका पथकाने काशिगाव पोलिसांच्या बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने दिवाळी काळात झालेली २६ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. ह्या भागातील आणखी २५ बेकायदा बांधकामे तोडली जाणार असल्याचे महापालिका जनसंपर्क विभाग कडून सांगण्यात आले आहे.
मात्र ही संख्या नाममात्र असून ह्या भागात काही हजार अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. २०११ - १२ सालात सनदी अधिकारी विक्रम कुमार हे आयुक्त असताना त्यांनी ह्या भागातील सुमारे १८०० अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली होती. तसे धाडस महापालिका व पोलीस दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.