शाई धरणग्रस्त आंदोलक अखेर निर्दोष; २५ आंदोलकांची मुक्तता
By सुरेश लोखंडे | Updated: March 24, 2023 18:31 IST2023-03-24T18:31:01+5:302023-03-24T18:31:15+5:30
शाई धरणग्रस्त २५ आंदाेलकांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

शाई धरणग्रस्त आंदोलक अखेर निर्दोष; २५ आंदोलकांची मुक्तता
ठाणे: ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात येणाऱ्या शाई धरणाच्या भूसंपादनाला आंदाेलनाद्वारे विराेध करण्यात आला हाेता. त्यातील तब्बल २५ गावकऱ्यांवर गुन्हे दाखल हाेऊन कारवाई झाली हाेती. याविराेधात न्यायालयात धाव घेतली असता अखेर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी या २५ आंदाेलकांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे या शाई नदीच्या काठावरील गावकऱ्यांमध्ये आनंदाेत्सव व्यक्त करण्यात येत आहे, असे या आंदाेलनाचे नेतृत्व करणारे पांडुरंग वारघडे यांनी लाेकमतला सांगितले.
ठाणे शहराची भविष्यातील तहान भागवणाऱ्या शाई धरणासाठी जागेचे भूसंपादन न करता सरकारने एफ.ए.कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याआधीच काम करण्याची परवावनगी दिली हाेती. शेतकऱ्यांचे पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही बाबीचा विचार न करता थेट काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकऱ्यांनी विराेध केला हाेताे. या आंदाेलक शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून ठेकेदाराने २५ आंदोलकांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आराेप केला जात आहे. गेल्या ४ वर्षांपासून हे प्रकरण कल्याण सत्र न्यायालयात सुरू होते.अखेर १२ वर्षानंतर २५ आंदोलकांची पुरेशा पुराव्या अभावी कल्याण न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याचे वारघडे यांच्यासह आंदोलनकर्ते बबन हरणे यांनी सांगितले.
या खटल्यासाठी ॲड चंद्रावती सरखोत व ॲड. मंगेश देशमुख यांनी विनामोबदला या सर्व आंदोलकांची विशेष बाजू मांडली. यामुळे आंदाेलनकर्ते प्रशांत सरखोत, पांडुरंग वारघडे, उमेश वारघडे, बबन हरणे, बेबी वारघडे, अशोक देशमुख, चंद्रकांत वारघडे, देऊ शिंगोळे, अनंता वारघडे, बाळु भंडारी, संतोष वारघडे, सचिन भोईर, शिवाजी भोईर, पांडुरंग भोईर, विनायक भोईर, किसन भोईर, बारकु भोईर, पंढरीनाथ कारभोल, रमेश मुरेकर, महेंद्र रांजणे, नामदेव रांजणे, यशवंत मुरेकार, विशाल देशमुख, ज्ञानेश्वर तिवार, संदीप भंडारी या २५ जणांची मुक्तता झाली आहे.