एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 बेडचे रुग्णालय - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:21 IST2025-01-12T06:20:47+5:302025-01-12T06:21:07+5:30

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ ठाण्यातील एसटीच्या खोपट येथील आगारात सरनाईक यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते.

25-bed hospital in each district for ST employees - Transport Minister Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 बेडचे रुग्णालय - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 बेडचे रुग्णालय - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात २५ बेडचे रुग्णालय आणि मुंबईत बोरिवली येथे १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा मानस राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी व्यक्त केला. त्याठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातील, याची काळजी घेऊ, असे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ ठाण्यातील एसटीच्या खोपट येथील आगारात सरनाईक यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. सरनाईक म्हणाले की, बोरिवली येथील आगार पीपीपी तत्त्वावर विकसित केले जाणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने इतर आगार विकसित केली जाणार आहेत. त्याठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना  मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. रस्ते सुरक्षा अभियानात एसटी चालवताना चालक आणि वाहकांकडून काळजी घेतली जावी. 

प्रवाशांना चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. खोपट आगाराची दुरवस्था झाली होती. परंतु आता त्याचा कायापालट झाला आहे. केवळ मी येथे आलो म्हणून सुविधा देऊ नका. या सुविधा त्या कर्मचाऱ्यांना कायम कशा मिळतील, चांगले प्रसाधनगृह कसे उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगत सरनाईक यांनी परिवहन अधिकाऱ्यांचे कान टोचले.

 पुढील महिन्यात गुजरातमध्ये जाऊन तेथील डेपोंची आणि कर्नाटकमध्ये परिवहनकडून चांगली सेवा दिली जाते, त्यामुळे तेथील पाहणी करून, तशा सुविधा आपल्या राज्यात कशा देता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी सरनाईक यांच्या हस्ते परिवहनमध्ये दाखल झालेल्या नवीन १७ लालपरीचा प्रारंभ करण्यात आला. 

 रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा मृत व्यक्तीच्या नातेवाइकांचे दुःख खूप मोठे असून, पुढे अपघातात चूक कोणाची यावरच आपण चर्चा करत बसतो. खरं तर अपघात घडू नये म्हणून वाहतूक नियमांचे पालन, वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघाताचे प्रमाण नक्की कमी होण्यास मदत मिळेल, असे प्रतिपादन  सरनाईक यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्यावेळी केले.

Web Title: 25-bed hospital in each district for ST employees - Transport Minister Pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.