‘तानसा’चे १९ दरवाजे उघडले; शहापूरात २ घरांचे नुकसान, गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:07 IST2025-07-26T09:07:33+5:302025-07-26T09:07:54+5:30
तानसा धरणाचे १९ दरवाजे उघडून तीन हजार ३१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

‘तानसा’चे १९ दरवाजे उघडले; शहापूरात २ घरांचे नुकसान, गावांना सतर्कतेचा इशारा
ठाणे : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर वाढला होता. शुक्रवारी सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३२.३ मि.मी. पाऊस नोंदवला गेला असून आतापर्यंत एकूण ५८५ मि.मी. (७७ टक्के) पाऊस पडला आहे. शहापूरमध्ये एक घर कोसळले असून अन्य घटनेत घराच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र, सुदैवाने दिवसभरात जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, तानसा धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शहापूर तालुक्यातील सोगाव येथील लक्ष्मण कचरू यांचे कच्चे बांधकाम असलेले घर शुक्रवारी पावसात कोसळले. तसेच गणेश महादू वाघ, (रा. वेहळोली बुद्रुक) यांच्या घराची एक भिंत पावसामुळे कोसळली असून दुसऱ्या भिंतीला तडा गेला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तानसा धरणाचे १९ दरवाजे उघडून तीन हजार ३१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
कोणतीही जीवितहानी नाही
अशाच प्रकारे भातसा, अपर वैतरणा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा धरणांचे दरवाजेही उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात पावसामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
काळू नदी, उल्हास नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर
जिल्ह्यात पडणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुपारी शाळा सुटत असताना सतत पडणाऱ्या पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागले आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काळू नदी टिटवाळ्याजवळ धोक्याचा इशारा पातळी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याचप्रमाणे उल्हास नदीसह जांभूळपाडा, मोहने आणि बदलापूरजवळही नद्या दुथडी भरून वाहत आहेत.