१८ वर्षात मीरा भाईंदर मधील हरित क्षेत्र १३.६ टक्क्यांनी घटले तर बांधकाम क्षेत्रात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ
By धीरज परब | Updated: January 29, 2025 22:48 IST2025-01-29T22:47:21+5:302025-01-29T22:48:19+5:30
हवेतील कार्बन आणि तापमानात मोठी वाढ

१८ वर्षात मीरा भाईंदर मधील हरित क्षेत्र १३.६ टक्क्यांनी घटले तर बांधकाम क्षेत्रात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर शहरात निसर्गाची अतोनात हानी आणि बांधकामांचा धुमाकूळ प्रशासन , राजकारणी , विकासक , भरणी माफिया यांच्या अभद्र संगनमताने होत असल्याच्या आरोपांना आता पालिकेनेच खरे ठरवले आहे . हवामान कृती आराखडा जाहीर करताना शहरातील हरित क्षेत्र १३ . ६ टक्क्यांनी घटले तर बांधकाम क्षेत्रात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे . हवेतील कार्बन आणि तापमानात मोठी वाढ झाल्याचे मान्य केले आहे.
शहरातील प्रदुषणाला आळा घालून २०४७ पर्यंत शहरातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅटच्या संयुक्त विद्यमाने हवामान कृती आराखडा तयार केला आहे . बुधवार २९ जानेवारी रोजी वांद्रे येथे आयोजित हवामान आराखडा कृती कार्यशाळेत जाहीर करण्यात आला आहे.
ह्यावेळी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाली आणि आगा खान एजन्सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा, आयुक्त संजय काटकर , उपायुक्त कल्पिता पिंपळे व प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित, सहायक संचालक पुरषोत्तम शिंदे , नगर सचिव वासुदेव शिरवळकर, मुख्यलेखापरिक्षक सुधीर नाकाडी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. शिवाय विविध कंपन्यांचे सामाजिक दायीत्त्व विभागाचे प्रतिनिधी, विचारवंत आणि हवामान तज्ज्ञ यांच्यासह महाराष्ट्र राज्य हवामान कृती सेल, सी४० सिटीज, आणि युनायटेड नेशन्स ह्युमन सेटलमेंट्स प्रोग्राम यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
२००५ ते २०२२ दरम्यान शहरातील बांधकाम क्षेत्रफळ ५०.०५% ने वाढले असून हरित क्षेत्र १३.६% पर्यंत घटले आहे . या शहरी विस्तारामुळे वार्षिक तापमान ०.४६°C ने वाढले आहे. त्यामुळे पूरस्थिती, पाणी समस्या, वाहतूक कोंडी आदी समस्या वाढल्या आहेत.
शहरात विविध प्रकारे कार्बनचे उत्सर्जन होत असते. ग्रीन हाऊस गॅस मूल्यांकनानुसार स्थिर ऊर्जेमुळे ६२% कार्बनचे तर वाहतुकीमुळे २२% आणि कचरा क्षेत्रामुळे १६% कार्बनचे उत्सर्जन होत असते. ही समस्या सोडविण्यासाठी आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅटच्या संयुक्त विद्यमाने हवामान कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी इनोव्हेशन सेलच्या माध्यमातूम, सीइजीपी फाउंडेशनने ज्ञान भागीदार म्हणून योगदान दिले आहे .
शहराला २०४७ पर्यंत विकासित शहराचा दृष्टीकोन साध्य करण्यासाठी, ऊर्जा व्यवस्थापन आणि निर्मिती, पाणीपुरवठा, पूरस्थिती, शहरी हरितीकरण, जैवविविधता, गतिशीलता, हवेची गुणवत्ता, कचरा व्यवस्थापन आदी विषय केंद्रस्थानी ठेवून उपाययोजना केल्या जाणार आहेत. याशिवाय, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडून नियोजित २३% उत्सर्जन कपात आणि हरित आवरण वाढवून ४१% कार्बन शोषण करण्याचे लक्ष्य आहे.
यावेळी प्रवीण परदेशी म्हणाले कि , मुंबई आणि त्यांच्या सलग्न शहरांमध्ये विविध शहरी समस्या निर्माण झाल्या असून, नवी आव्हाने समोर येत आहेत. जगातील प्रमुख शहरांची तुलना मुंबईसह केल्यावर लक्षात येते मुंबईत सर्वाधिक हरित पट्टा आहे, मात्र तरी वायू प्रदुषणात आपले स्थान सर्वोच्च याचे कारण वाढती वाहने यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तसेच शाश्वत विकासाच्या दृष्टीने नियोजनपूर्ण उपाययोजनात्मक
अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून त्यासाठी विविध प्रकारची पावले उचलली जात आहेत.
मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले कि , शहरात शाश्वत विकास व्हावा, सिटी क्लायमेट अॅक्शन प्लॅनद्वारे विविध उपाययोजनात्मक पावले उचलून शहरात प्रत्यक्ष पर्यावरणपूरक जीवनशैली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच होम@२० सारख्या उपक्रमांद्वारे, उत्सर्जन कमी केले जाणार आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांसाठी विशेष मॉडेल
गृह वापरातील वीज वापर हा उत्सर्जनाचा ४०.५% भाग आहे. महानगरपालिकेने येथील नवयुवन हाउसिंग सोसायटीतील प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवून ६०% पेक्षा अधिक उत्सर्जन कपात केली आहे. यासाठी सौर उर्जा पीव्ही प्रणाली, बीएलडीसी फॅन, एलईडी दिवे आणि पाण्याच्या बचतीसाठी उपकरणे आदींचा वापर करण्यात आला आहे. हे मॉडेल यशस्वी ठरले असून त्याचा शहरात अंमलबजावणी केली जाणार आहे.