पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 08:20 IST2025-12-19T08:20:10+5:302025-12-19T08:20:27+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत अगोदर वक्तव्ये करून ऐनवेळी शिंदेसेनेसोबत युती करण्याच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेविरूद्ध सूर उमटत आहे.

पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत अगोदर वक्तव्ये करून ऐनवेळी शिंदेसेनेसोबत युती करण्याच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेविरूद्ध सूर उमटत आहे. १८ मंडल अध्यक्षांनी आम्हाला युती करून नव्हे तर स्वबळावर निवडणुका लढवण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना लिहिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातूनच युती नको, अशी मागणीची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर आता ठाण्यातील भाजपच्या १८ मंडल आणि प्रांत अध्यक्षांनी युती नको, अशी भावना व्यक्त केली. युतीमुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे, युती न केल्यास कार्यकर्त्यांना सर्व ठिकाणी लढायला मिळेल, आता ठाण्यात भाजपची ताकद वाढली आहे, पक्षातील आजी-माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये गड मजबूत केले आहेत, ज्या प्रभागात भाजप कुठेही नव्हती, त्याठिकाणी मोठी फळी निर्माण झाली, त्यात २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करता
'वेळप्रसंगी पदाचा राजीनामा देऊन घरी बसू'
मागील काही वर्षात मतांचा टक्का वाढला आहे. स्वबळावर लढल्यास पक्षाला वाढण्यास पोषक वातावरण मिळणार आहे. आता संधी मिळाली नाहीतर आधीच आमची चार वर्षे वाया गेली आहेत, आणखी पाच वर्षे वाया जातील. त्यामुळे युती न करता स्वबळावर लढावे, अशी मागणी करीत आहे. अन्यथा आम्ही शिंदेसेनेचे काम करणार नाही, वेळप्रसंगी पदाचा राजीनामा देऊन घरी बसू, असा इशारा देण्यात आला आहे.
"प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. संधीचे सोने करण्याची आणि युती करू नका, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु, वरिष्ठांचा निर्णय हा आम्हाला मान्य आहे. त्यानुसार पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आम्ही करू." - संदीप लेले, शहराध्यक्ष, भाजप, ठाणे
आतापासूनच त्याची तयारी करणे अपेक्षित असल्याचे मत मंडल अध्यक्षांनी आ. संजय केळकर, शहराध्यक्ष संदीप लेले यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केले. यावरून आता ठाणे भाजपमध्ये नवीच चर्चा सुरु झाली आहे.