स्मार्ट सिटींचे 112 प्रकल्प कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 08:04 AM2021-08-16T08:04:22+5:302021-08-16T08:04:45+5:30

smart cities : गेल्या तीन वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे महापालिकेने ११३ कोटी २३ लाख रुपयांचे २० प्रकल्प, तर सर्वात तळाला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने चार कोटी ६६ लाख रुपयांचे तीन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत.

112 projects of smart cities awaiting work orders | स्मार्ट सिटींचे 112 प्रकल्प कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेत 

स्मार्ट सिटींचे 112 प्रकल्प कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेत 

Next

- नारायण जाधव

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटीअंतर्गत महाराष्ट्रातील औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर आणि ठाणे या आठ शहरांची चार फेऱ्यांमधून जानेवारी २०१६ ते जून २०१८ या काळात स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली. यात एकूण २३ हजार ३० काेटी रुपयांचे २८२ प्रकल्प मान्यतेसाठी धाडले. यापैकी ९ जुलै २०२१ पर्यंत राज्याचे तीन हजार ४७१ कोटी ३४ लाख १२८ रुपयांचे प्रकल्पच पूर्ण झाले आहेत. यासाठी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत आपल्या हिश्श्याचा दोन हजार १२८ कोटी २३ लाख रुपयांचा निधी दिला असून, त्यातील या शहरांनी एक हजार ९२० कोटी ९२ लाख रुपये खर्च केले. अजूनही १३ हजार ४०२ कोटी ३९ लाख रुपयांचे ११२ प्रकल्प कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या तीन वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे महापालिकेने ११३ कोटी २३ लाख रुपयांचे २० प्रकल्प, तर सर्वात तळाला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने चार कोटी ६६ लाख रुपयांचे तीन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. ठाणे महापालिकेच्या एकूण सहा हजार १०२ कोटी ४७ लाख रुपयांच्या ४१ प्रकल्पांपैकी पाच हजार ७५० कोटी रुपयांचे २०, तर कल्याण-डोंबविली महापालिकेचे एक हजार ५५५ कोटी १५ लाख रुपयांच्या १९ प्रकल्पांपैकी एक हजार तीनशे ९५ कोटी ४८ लाख रुपयांचे १३ प्रकल्प कार्यादेशाच्या प्रतीक्षेत आहेत, तर निविदा प्रक्रियेत ठाणे महापालिका २३९ कोटींचा एक, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे १५५ कोटींचे तीन प्रकल्प आहेत.

नागपूर पालिकेची बाजी
स्मार्ट सिटीअंतर्गत राज्यात सर्वाधिक प्रकल्प नागपूर महापालिकेने ९९४ कोटी ४१ लाख रुपयांचे तीन प्रकल्प, तर पुणे महापालिकेने ८३७ कोटी ८५ लाख रुपयांचे २७ प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्याखालोखाल नाशिक महापालिका ६४९ कोटी २२ लाखांचे २६ प्रकल्प, औरंगाबाद महापालिका ४४१ कोटी ४७ लाखांचे १२ प्रकल्प, सोलापूर महापालिका ३२५ कोटी ८४ लाखांचे २८ प्रकल्प पूर्ण केले आहेत.

आठ महापालिकांची चिंता वाढली
औरंगाबाद २८३ कोटींचे १० प्रकल्प, कल्याण-डोंबिवली महापालिका एक हजार तीनशे ९५ कोटी ४८ लाख रुपयांचे १३ प्रकल्प, ठाणे महापालिकेचे पाच हजार ७५० कोटी रुपयांचे २० प्रकल्प, नागपूर महापालिका दोन हजार ४२ कोटींचे चार प्रकल्प, नाशिक महापालिका २७४ कोटी ५० लाखांचे दोन प्रकल्प, पिंपरी-चिंचवड महापालिका ८३ कोटींचे दोन प्रकल्प, पुणे महापालिका दोन हजार १३९ काेटी ८२ लाखांचे १२ प्रकल्प, सोलापूर ९९६ कोटी पाच लाखांच्या १३ प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आधीच कोविडमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील या आठ महापालिकांना आता निविदा प्रक्रियेतील आणि कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेतील प्रकल्प कसे पूर्ण करायचे याची चिंता सतावू लागली आहे.

Web Title: 112 projects of smart cities awaiting work orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे