मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण एसटी बस डेपोतून कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बसेस चालविल्या जात होत्या. त्यामुळे तेव्हा डेपोला मोठा आर्थिक फटका बसला. दुसऱ्या लाटेच्या वेळीही बसेस कमी चालविल्या गेल्या. मात्र, या लाटेनंतर निर्बंध शिथिल होताच बसेसची संख्या वाढली. त्याचबरोबर प्रवासी भारमानही वाढत आहे. त्यामुळे सध्या कल्याण बस डेपोतून १०० टक्के बसेस चालविल्या जात आहेत. दुसरीकडे दुरुस्तीसाठी किमान १० बसेस दररोज डेपोतील कार्यशाळेत उभ्या राहत आहेत.
कल्याण एसटी बस डेपोतून १०० टक्के बसेस चालविल्या जात असून, त्या पूर्ण प्रवासी क्षमतेने चालविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, सध्याच्या निर्बंधांनुसार उभ्याने प्रवास करण्यास बंदी आहे. बस डेपोतील ७० बसेस सध्या सुरू आहेत. यापूर्वी केवळ २५ बसेस चालविल्या जात होत्या. १०० टक्के बसेस धावत असतानाही प्रवाशांना कामावर पोहोचण्याची घाई असते. वेळेत बस न मिळाल्यास कल्याण-भिवंडी, कल्याण-मुरबाड आणि कल्याण-शीळ, कल्याण-मलंगरोड मार्गावरील प्रवासी रिक्षाने प्रवास करतात. परंतु, रिक्षाचे भाडे जास्त असल्याने मुरबाड, शीळ, मलंग रोड येथे जाण्यासाठी प्रवासी सहाआसनी जीपचा आधार घेत आहेत.
बस भाड्याच्या तुलनेत खासगी वाहनांचे भाडे जास्त आहे. कल्याण-भिवंडी बस भाडे १५ रुपये आहे, तर रिक्षाने एका प्रवाशाला ५० ते ६० रुपये मोजावे लागतात. सर्व मार्गांवर बसेस धावत असल्याचा दावा डेपो प्रशासनाने केला असला तरी, प्रवाशांच्या मते सर्व मार्गांवरील बसेस वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वेळेत कार्यालय अथवा इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी प्रवासी जीप, रिक्षाचाच आधार घेतात.
---------------------
सर्व मार्गावर बहुतांश बसेस सुरू
कल्याण बस डेपोतून दररोज ७० बसेस विविध मार्गांवर चालविल्या जातात. कल्याण-मुरबाड, कल्याण-भिवंडी, कल्याण-पनवेल, कल्याण-नगर, कल्याण-नाशिक, कल्याण-पुणे या गाड्या सुरू आहेत. कल्याण-पुणे बस सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत असल्या तरी, पुण्याला जाण्यासाठी प्रवासी ओला, कूल कॅबचाही आधार घेत आहेत. त्यात प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. मात्र, कार्यालयीन काम, बैठकांना वेळेत तसेच इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ते खासगी मोटारींवर अवलंबून राहत आहेत.
-----------------------------
प्रवाशांना वेळप्रसंगी जीप, रिक्षाचा आधार
अनेकदा बस सुटल्यावर प्रवाशांना शक्य असल्यास रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. प्रत्येकी एका सीटमागे ७० ते ८० रुपये मोजावे लागतात. कल्याण-भिवंडी मार्गावर बस उपलब्ध असूनही काही प्रवासी रिक्षाने भिवंडी गाठतात. तसेच भिवंडीहून कल्याणला रिक्षाने येतात. रिक्षाचालक कधी ५० रुपये प्रतिसीट, तर कधी ६० रुपये सीटने भाडे आकारतो. कल्याण-मुरबाड, कल्याण-टिटवाळा तसेच कल्याण-शीळ रस्त्यावरही खासगी जीप, वाहनांचा आधार घेतला जातो. मात्र, जीपचालक कोंबून प्रवासी भरतो, तेव्हा कुठे जीप पुढे निघते.
----------------------------
काय म्हणतात प्रवासी...
१. मी टिटवाळा ग्रामीण भागात राहतो. मला टिटवाळ्यापर्यंत जाण्यासाठी वेळेवर बस मिळत नाही. त्यामुळे मला ७० रुपये देऊन रिक्षाने कल्याणहून टिटवाळा गाठावे लागते. लॉकडाऊनमध्ये जास्त त्रास झाला.
- चंद्रकांत पाटील, प्रवासी.
२. कल्याण-मुरबाड मार्गावर कल्याणहून अनेक बसेस चालतात. मात्र, बस कधी वेळेवर येत नाही. तेव्हा आम्ही जीपने कल्याणहून मुरबाड गाठतो. सकाळी कामावर जाण्याची घाई असते. त्यामुळे मुरबाडहून कल्याणला जीपने येतो.
- राजेश शेळके, प्रवासी.
----------------------------
कल्याण बस आगारातील एकूण बसेस - ७०
रस्त्यावर धावणाऱ्या एकूण बसेस - ६०
दुरुस्तीसाठी आगारात असलेल्या एकूण बसेस - १०
एकूण वाहक-चालक - २४२
वाहक - ६७
चालक - ६७
वाहक-चालकाचे दोन्ही काम करणारे - १०६
सध्या कामावर असलेले वाहक - ६९
सध्या कामावर असलेले चालक - ६३
-----------------------------