मीरा-भाईंदर महापालिकेच्या तरण तलावात बुडून १० वर्षीय मुलाचा मृत्यू; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 05:54 IST2025-04-21T05:53:31+5:302025-04-21T05:54:03+5:30
रविवारी पार्थचे वडील दीपेश हे सर्वांना क्रीडा संकुलात सोडून बाहेर थांबले होते

मीरा-भाईंदर महापालिकेच्या तरण तलावात बुडून १० वर्षीय मुलाचा मृत्यू; गुन्हा दाखल
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पूर्व येथील गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील तरण तलावात बुडून ग्रंथ मुथा या १० वर्षाच्या मुलाचा रविवारी मृत्यू झाला. नवघर पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
भाईंदर पश्चिमेच्या १५० फुटी रस्त्यावरील महादेव हाईट्समध्ये राहणारा ग्रंथ मित्रांसह तरण तलावात पोहणे शिकण्यास जात असे. रविवारी पार्थचे वडील दीपेश हे सर्वांना क्रीडा संकुलात सोडून बाहेर थांबले होते. थोड्या वेळाने ग्रंथचा मित्र चैत्यने ग्रंथ पाण्यात बुडाल्याचे त्यांना सांगितले. दीपेश यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशिक्षकांनी ग्रंथला बाहेर काढले होते परंतु तो बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरने अतिदक्षता विभागात दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे ग्रंथला दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी ठेकेदार साहस चॅरिटेबल ट्रस्ट, व्यवस्थापक वर्ग व इतर, प्रशिक्षक नारायण नायक, हिंगोला नायक, प्रथमेश कदम व अर्जुन कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.