ठाणे : चलनातून बाद झालेल्या नोटा बाळगणाऱ्या आॅलीवर लॉरेन्स निकाळजी (१९, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) याला वागळे इस्टेट पोलिसांनी १० आॅगस्ट रोजी अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटींच्या नोटा आणि कार असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी गावात १० आॅगस्ट रोजी उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना तीनहातनाका येथे एका कारमधून जुन्या नोटा येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने सायंकाळी ६ वा. च्या सुमारास एलबीएस मार्गावरील इटरनिटी मॉलच्या समोर संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या या कारमधील आॅलिव्हर याची चौकशी केली. तेंव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या कारच्या झडतीमध्ये चलनातून बाद झालेल्या पाचशे रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १९ हजार नोटा (९५ लाख रुपये ) तर एक हजारांच्या पाचशे नोटा (पाच लाख रुपये ) अशा एक कोटींच्या नोटा हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी सांगितले. कोणीतरी आले त्यांनी या नोटा आपल्याकडे दिल्या असून या नोटा आपल्या नसल्याचा दावा आॅलीव्हर लॉरेल्स याने केला आहे. दरम्यान, ठाणे न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. आयकर विभाग आणि रिझर्व बँक आॅफ इंडियाकडे याबाबत माहिती दिल्याचेही वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात मिळाल्या चलनातून बाद झालेल्या एक कोटींच्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:18 IST
चलनातून बाद झालेल्या पाचशे रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १९ हजार नोटा (९५ लाख रुपये ) तर एक हजारांच्या पाचशे नोटा (पाच लाख रुपये ) अशा एक कोटींच्या नोटा वागळे इस्टेट पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
ठाण्यात मिळाल्या चलनातून बाद झालेल्या एक कोटींच्या नोटा
ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलिसांची कारवाईआरबीआयला दिली माहितीनोटांसह कारही जप्त