बुलडाणा : दुसरबीड नाक्याजवळ २७ लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त; पाच जणांना अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:09 AM2018-01-30T02:09:47+5:302018-01-30T02:14:42+5:30

किनगाव राजा (बुलडाणा): किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या दुसरबीड नाक्याजवळ वाशिम जिल्ह्यातून आलेल्या एका वाहनातून चलनातून बाद झालेल्या २६ लाख ४५ हजाराच्या जुन्या नोटा पकडल्याची घटना रविवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

Buldhana: The old indian currency 27 lakh rupee seized, near the dusarbid-naka; Five arrested! | बुलडाणा : दुसरबीड नाक्याजवळ २७ लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त; पाच जणांना अटक!

बुलडाणा : दुसरबीड नाक्याजवळ २७ लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त; पाच जणांना अटक!

googlenewsNext
ठळक मुद्देअटक करण्यात आलेल्यांमध्ये अकोल्यातील एकाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
किनगाव राजा (बुलडाणा): किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या दुसरबीड नाक्याजवळ वाशिम जिल्ह्यातून आलेल्या एका वाहनातून चलनातून बाद झालेल्या २६ लाख ४५ हजाराच्या जुन्या नोटा पकडल्याची घटना रविवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा हद्दीत २८ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी सोबत पोलीस कर्मचारी दत्तात्रय लोढे गस्तीवर असताना त्यांना वाशिम जिल्ह्यातून एक कार चोरी करून मेहकरवरून सिंदखेडराजाकडे जात असल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दूरध्वनीद्वारे दिली. या माहितीच्या आधारे  पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राज्य महामार्ग क्रमांक १८३ रस्त्यावर नाकाबंदी करून सदर कार ताब्यात घ्या,  असे कर्मचार्‍यांना कळविले. त्यावरून सहाय्य पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळेसोबत पोलीस कर्मचारी अनिल खार्डे, गणेश बांडे, गजानन सानप, विष्णू सानप, नाजूकराव वानखडे, चालक  विनोदसिंग राजपूत यांनी दुसरबीड टोल नाका येथे राज्य महामार्ग क्रमांक १८३ रस्त्यावर रात्री २ वाजताच्या दरम्यान नाकाबंदी करून वाहने तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी सिंदखेडराजाकडून  एम. एच. २८ ए. एन. २१९५  वाहन  येताना दिसली. कारला थांबवून कार चालकाला नाव, गाव विचारले असता, त्याने त्यांचे नाव व गाव घाबरलेल्या अवस्थेत सांगितल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी कारमधील व्यक्तींना विचारपूस केली असता, सादीक खान मोहम्मद अली खान वय ३६ रा.गैबी नगर नांदुरा जि. बुलडाणा, पार्थ अविनाश लोंढे वय २५ रा. रेणुकानगर, जि. अकोला, मुकेश गोकुळ पाटील वय २६ रा.जुना फैल खामगाव जिल्हा बुलडाणा, मो.साबीर शे. युसूफ वय ४२ रा.नांदुरा जि. बुलडाणा व प्रशांत भुजंगराव निंबाळकर, वय ४१ रा. नांदुरा जिल्हा बुलडाणा अशी नावे सांगितली. त्यावेळी वाहनाची झडती घेतली असता, वाहनाच्या मागच्या डिक्कीत एका वायरच्या थैलीत भारतीय बनावटीच्या चलनातून बाद केलेल्या एक हजार रुपयांच्या १३६८ जुन्या नोटा किंमत १३ लाख ६८ हजार रुपये व ५00 रुपयांच्या २५५४ नोटा किंमत १२ लाख ७७ हजार रुपये अशा एकूण २६ लाख ४५ हजार रुपये रोख रकमेच्या जुन्या नोटा चलनातून बाद केलेल्या आढळून आल्या.  यावेळी चलनातून बाद केलेल्या जुन्या नोटा कोठून आणल्या? व कोठे नेणार आहात? या नोटा कुणाच्या मालकीच्या आहेत? याबाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने दोन पंचांसमक्ष पंचनामा प्रमाणे जप्त करून पाचही आरोपींना अटक करण्यात आली. 
यावेळी चलनातून बाद केलेल्या नोटा २६ लाख ४५ हजार रुपये,  ७ लाख रुपये किमतीचे वाहन तसेच वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल अंदाजे किंमत ११ हजार ५00 रुपये असा एकूण ३३ लाख ५६ हजार ५00 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी  अधिक तपास पोलीस अधीक्षक मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी करीत आहेत. 

रॅकेट उघडकीस  येण्याची शक्यता!
दुसरबीड नाक्याजवळ एका वाहनातून चलनातून बाद झालेल्या २६.४५ लाखाच्या जुन्या नोटा पकडण्यात आल्यामुळे जिल्ह्यात जुन्या नोटा बदलून देणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीकोनातून पोलीस तपास करीत आहे.
 

Web Title: Buldhana: The old indian currency 27 lakh rupee seized, near the dusarbid-naka; Five arrested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.