Wimbledon 2018: 'स्टार वॉर' गाजले, पण 'ते' उगवते तारेही चार तास लढले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 16:42 IST2018-07-14T16:41:19+5:302018-07-14T16:42:03+5:30
पुरूष एकेरीच्या सहा तासाहून अधिक चाललेल्या सामन्याची चर्चा असताना कोर्ट क्रमांक तीनवरही एक सामना 4 तास 24 मिनिटे चालला. तीन सेटच्या या सामन्याने टेनिसप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती

Wimbledon 2018: 'स्टार वॉर' गाजले, पण 'ते' उगवते तारेही चार तास लढले!
लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीत केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेला उपांत्य फेरीचा सामना ठरला. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अँडरसनने 7-6(6), 6-7(5), 6-7(9), 6-4, 26-24 अशा फरकाने बाजी मारली. पुरूष एकेरीच्या सहा तासाहून अधिक चाललेल्या सामन्याची चर्चा असताना कोर्ट क्रमांक तीनवरही एक सामना 4 तास 24 मिनिटे चालला. तीन सेटच्या या सामन्याने टेनिसप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती.
Centre Court was not the only place a marathon match played out on day 11...#Wimbledonhttps://t.co/eAcxJQRU9v
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2018
ब्रिटनचा जॅक ड्रॅपर आणि कोलंबियाचा निकोलस मेजीया यांच्यातील मुलांच्या एकेरीचा उपांत्य फेरीचा सामना विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वाधिक काळ चालणारा ठरला. 4 तास 24 मिनिटे चाललेल्या सामन्यात ड्रॅपरने 7-6 (7-5), 6-7(6-8), 19-17 अशी बाजी मारली. अँडी मरेचा चाहता असलेल्या ड्रॅपरला जेतेपद पटकावून इतिहास घडवण्याची संधी आहे. 1962नंतर मुलांच्या गटात ब्रिटनच्या खेळाडूंना जेतेपद पटकावता आलेले नाही. 1962मध्ये स्टॅनली मॅथ्यू यांनी जेतेपदाचा चषक उंचावला होता. 2011 मध्ये ब्रिटनच्या लियॅम ब्रॉडीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर मुलींच्या एकेरीत लॉरा रॉबसन (2008 ) ही जेतेपद पटकावणारी अखेरची ब्रिटीश खेळाडू आहे.