Sumit Nagal wins ATP Challenger title | सुमित नागलला एटीपी चॅलेंजरचे जेतेपद
सुमित नागलला एटीपी चॅलेंजरचे जेतेपद

ब्युनर्स आयर्स : भारतीयटेनिसपटू सुमित नागलने स्थानिक दावेदार पाकुदो बोगनिसचा थेट सेट््समध्ये पराभव करीत येथे एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले. हरियाणाच्या २२ वर्षीय सातव्या मानांकित नागलने आठव्या मानांकित बोगनिसचा एक तास व ३७ मिनिटांमध्ये ६-४, ६-२ ने पराभव करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

नागलचे कारकिर्दीतील हे दुसरे एटीपी चॅलेंजर जेतेपद आहे. यापूर्वी त्याने २०१७ मध्ये बेंगळुरू चॅलेंजर स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. क्रीडामंत्री किरेन रिजीजूने नागलचे अभिनंदन करताना टिष्ट्वटर हँडलवर लिहिले की,‘सुमित नागलची चमकदार कामगिरी. एटीपी ब्युनस आयर्स चॅलेंजर्सचे जेतेपद पटकावण्यासाठी त्याचे अभिनंदन करतो. सुमित नागल याने विश्व मानांकनामध्ये अव्वल १३५ मध्ये स्थान मिळवले.’

या प्रतिभावान युवा खेळाडूने सोमवारी २६ स्थानांच्या प्रगतीसह कारकिर्दीतील सर्वोत्तम १३५ वे मानांकन मिळवले. नागल गेल्या महिन्यात ग्रँडस्लॅम पदार्पण करताना अमेरिकन ओपनमध्ये पहिल्या फेरीत महान खेळाडू रॉजर फेडररविरुद्ध चमकदार कामगिरी करीत प्रकाशझोतात आला होता.(वृत्तसंस्था)

Web Title:  Sumit Nagal wins ATP Challenger title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.