मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 05:40 IST2025-07-19T05:40:31+5:302025-07-19T05:40:40+5:30

चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या साईशा मधुर हिचा ३-१ असा पराभव केला.

Mumbai's Sara Jamsutkar becomes 'champion' | मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’

मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सारा जामसुतरक या मुंबई शहरच्या टेबल टेनिसपटूने शानदार कामगिरी करताना महाराष्ट्र राज्य रोख बक्षीस टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या १५ वर्षांखालील गटाचे जेतेपद पटकावले. तिने चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या साईशा मधुर हिचा ३-१ असा पराभव केला.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या (एमएसटीटीए) मान्यतेने खार जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत साराने चार गेममध्ये बाजी मारताना साईशाचे कडवे आव्हान ३-११, ११-९, ११-५, ११-५ असे परतवले. प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवन टेबल टेनिस अकादमीमध्ये धडे गिरवणाऱ्या साराने पहिला गेम गमावल्यानंतर आक्रमक खेळ करत जबरदस्त पुनरागमन केले. या जोरावर तिने सलग तीन गेम जिंकून दिमाखात जेतेपद पटकाविले.

याआधी उपांत्य सामन्यात साराने ठाण्याच्याच ज्ञानश्री तर्डे हिचा ११-९, ११-६, ७-११, १०-१२, १२-१० असा रोमांचक पराभव केला होता. दुसरीकडे, साईशाने दी सबर्बन टेबल टेनिस संघटनेच्या (टीएसटीटीए) सारा रमैयाला ११-८, ११-८, ११-२ असे सलग तीन गेममध्ये नमवून विजयी आगेकूच केली होती.
 

Web Title: Mumbai's Sara Jamsutkar becomes 'champion'