माद्रिद ओपन : रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 03:34 IST2019-05-11T03:34:40+5:302019-05-11T03:34:59+5:30
शानदार फॉर्ममध्ये असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने याने माद्रिद ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना फ्रान्सच्या गेल मोंफिल्सला नमविले.

माद्रिद ओपन : रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत
माद्रिद : शानदार फॉर्ममध्ये असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटूरॉजर फेडररने याने माद्रिद ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना फ्रान्सच्या गेल मोंफिल्सला नमविले. आता उपांत्यपूर्व फेरीतही बाजी मारल्यास फेडरर उपांत्य सामन्यात दिग्गज नोव्हाक जोकोविचविरुद्ध लढेल. सर्बियाच्या जोकोविचने कोणत्याही अडथळ्याविना उपांत्य फेरी गाठली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू मारिन सिलिचने पोटदुखीमुळे माघार घेतल्याने जोकोविचला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला.
तीन वर्षांनंतर क्ले कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या फेडररने गुरुवारी दोन तास रंगलेल्या सामन्यात गेल मोंफिल्सचा ६-०, ४-६, ७-६ असा पराभव करीत अंतिम आठमध्ये प्रवेश मिळवला. पहिला सेट एकही गेम न गमावता जिंकल्यानंतर फेडररने दुसरा सेट ४-६ असा गमावला. तिसरा व निर्णायक सेटही अटीतटीचा रंगल्यानंतर टायब्रेकमध्ये बाजी मारत फेडररने विजयी कूच केली.
महिला गटात नाओमी ओसाकाहिला दोन महिन्यांत दुसऱ्यांदा बेलिंडा बेनसिच हिच्याकडून ३-६, ६-२, ७-५ असा पराभव पत्करावा लागला. स्वीत्झर्लंडच्या बेनसिच हिने दोन वेळेसची ग्रँडस्लॅम विजेत्या नाओमी हिला मार्च महिन्यात इंडियन वेल्समध्ये पराभूत केले होते. द्वितीय मानांकित व गत चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा हिला किकी बर्टन्सकडून २-६, ३-६ असा पराभवाचा सामना करावा लागला. (वृत्तसंस्था)