French Open: नदाल, जोकोविच यांची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 07:10 IST2021-06-03T07:09:48+5:302021-06-03T07:10:15+5:30
नदालने रोलाँड गॅरोमध्ये सलग २६ वा विजय मिळविताना पोपिरिनचा ६-३, ६-२, ७-६(३) असा पराभव केला.

French Open: नदाल, जोकोविच यांची विजयी सलामी
पॅरिस : लाल मातीचा बादशहf आणि विक्रमी १३ वेळा जेतेपद पटकावलेल्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेत अपेक्षित विजयी सलामी देताना ऑस्ट्रेलियाच्या २१ वर्षीय अॅलेक्सी पोपिरिन याला नमवले. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविच यानेही विजयी सुरुवात करताना अमेरिकेच्या टेनिस सँडग्रेन याचा पराभव केला.
नदालने रोलाँड गॅरोमध्ये सलग २६ वा विजय मिळविताना पोपिरिनचा ६-३, ६-२, ७-६(३) असा पराभव केला. नदाल १४ व्या फ्रेंच ओपन जेतेपदाच्या प्रयत्नात असून, यामध्ये यशस्वी ठरल्यास नदाल दिग्गज रॉजर फेडररला मागे टाकून सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकेल.
दोन सेट सहजपणे जिंकून आघाडी मिळविल्यानंतर नदाल तिसऱ्या सेटमध्ये २-५ असा पिछाडीवर पडला होता. मात्र, त्याने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना टायब्रेकमध्ये बाजी मारली. त्याचवेळी, जोकोविचनेही आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली.