फेडररसाठी ‘नंबर वन’ची गरज नाही, स्पेनचा दिग्गज राफेल नदालने मांडले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:48 IST2018-03-01T00:48:17+5:302018-03-01T00:48:17+5:30
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा स्टार रॉजर फेडरर यांच्यातील कोर्टवरील कट्टर प्रतिस्पर्धा जगजाहीर आहे. मात्र, त्याचवेळी हे दोघेही कोर्टबाहेर तितकेच चांगले मित्रही आहेत.

फेडररसाठी ‘नंबर वन’ची गरज नाही, स्पेनचा दिग्गज राफेल नदालने मांडले मत
जोहान्सबर्ग : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा स्टार रॉजर फेडरर यांच्यातील कोर्टवरील कट्टर प्रतिस्पर्धा जगजाहीर आहे. मात्र, त्याचवेळी हे दोघेही कोर्टबाहेर तितकेच चांगले मित्रही आहेत. अलीकडेच फेडररने दुखापतीतून जबरदस्त पुनरागमन करताना पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत नदालला मागे टाकले. यानिमित्ताने नदालने फेडररचे अभिनंदन करतानाच, ‘फेडररचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ‘नंबर वन’ची आवश्यकता नाही,’ असे म्हटले.
नदालने पुढे सांगितले की, ‘टेनिस विश्वात फेडरर कोणत्या स्थानी आहे, हे दाखविण्यासाठी त्याला अव्वल स्थानी येण्याची आवश्यकता नाही. त्याने टेनिसविश्वात जे काही मिळवलंय ते खूप कठीण असून तुम्ही यासाठी फक्त त्याचे अभिनंदन करू शकता.’ त्याचप्रमाणे, ‘क्रमवारी कधीच खोटे बोलत
नाही.
फेडररने गेल्या १२ महिन्यांमध्ये माझ्याहून अधिक चांगली कामगिरी केली आहे,’ असेही नदालने या वेळी स्पष्ट केले. गेल्याच आठवड्यात फेडररने एटीपी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. या वेळी त्याने अव्वल स्थान पटकावणारा सर्वांत बुजुर्ग खेळाडू अमेरिकेचा दिग्गज आंद्रे आगासीचा विक्रम मागे टाकला.
याआधी २००४ साली सर्वप्रथम अव्वल स्थानी आलेल्या रॉजर फेडररने २०१२ सालानंतर कधीही अव्वल स्थान काबीज केले नव्हते. विशेष म्हणजे जानेवारी २०१७ सालामध्ये फेडररची जागतिक क्रमवारीमध्ये तब्बल १७व्या स्थानापर्यंत घसरण झाली होती. (वृत्तसंस्था)