Dominic Thiem's thunderstorm continued, beating Djokovic in the semifinals | डॉमनिक थिएमचा झंझावात कायम, जोकोविचला नमवून गाठली उपांत्य फेरी

डॉमनिक थिएमचा झंझावात कायम, जोकोविचला नमवून गाठली उपांत्य फेरी

लंडन : ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमने एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील धमाकेदार कामगिरी कायम राखताना दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला. या शानदार कामगिरीसह त्याने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. याआधी सलामीच्या सामन्यात थिएमने दिग्गज खेळाडू रॉजर फेडररला पराभूत केले होते.
पाचव्या मानांकित थिएमने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सर्बियाच्या जोकोविचला तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात ६-७, ६-३, ७-६ असे नमविले. पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या थिएमने झुंजार खेळ सादर करत बाजी मारली. त्याचवेळी दुसरीकडे, सलामीचा सामना गमावलेल्या फेडररने विजयी पुनरागमन करताना इटलीच्या मातेओ बेरेतिनी याचा ७-६, ६-३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
या विजयासह फेडररने स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले असून अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता त्याला जोकोविचचे कडवे आव्हान परतवावे लागेल. या दोघांमध्येच यंदाच्या विम्बल्डनची अंतिम लढत रंगली होती. त्यामुळे पुन्हा एकदा टेनिसप्रेमींना टेनिसचा खरा थरार पाहण्याची संधी मिळणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Dominic Thiem's thunderstorm continued, beating Djokovic in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.