ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : जाेकाेविच, सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 05:58 IST2025-01-20T05:57:04+5:302025-01-20T05:58:42+5:30
Australian Open Tennis: जागतिक क्रमवारीतील बेलारूसची अव्वल टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल करताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : जाेकाेविच, सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत
मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील बेलारूसची अव्वल टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल करताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर पुरुष गटात नोव्हाक जोकोविच, कार्लोस अल्काराझ आणि अलेक्झांडर ज्वेरेव यांनीही अंतिम आठमधील स्थान निश्चित केले.
दहावेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचने २४व्या स्थानावरील जिरी लेहेस्का याला ६-३, ६-४, ७-६ असे पराभूत केले. जॅक ड्रेपर याने दुखापतीमुळे माघार घेतल्याने अल्काराझने आगेकूच केली. पुरुष गटात द्वितीय मानांकित ज्वेरेवने चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने उगो हम्बर्ट याला ६-१, २-६, ६-३, ६-२ असे पराभूत केले. विक्रमी २४ ग्रँडस्लॅम जिंकणारा जोकोविच आणि तृतीय मानांकित अल्काराझ यांनीही आगेकूच केली. उपांत्यपूर्व फेरीत दोघेही आमने-सामने असतील.
सबालेंकाने रशियाच्या १४व्या मानांकित मीरा अँड्रेवा हिचा पराभव केला. रॉड लेवर अरेनामध्ये झालेल्या सामन्यात जबरदस्त आक्रमक खेळ करताना सबालेंकाने अँड्रेवाचा ६-१, ६-२ असा सहज पराभव केला. सबालेंकाच्या वेगवान खेळापुढे अँड्रेवाला आपला खेळ सादरच करता आला नाही. यासह सबालेंकाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आपला सलग १८ वा विजयही नोंदवला. याआधी, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मार्टिना हिंगीसने सलग तीनवेळा जेतेपद पटकावले होते. तिने १९९७-१९९९ दरम्यान हा पराक्रम केला होता.
बोपन्ना-शुआई यांची आगेकूच
मिश्र दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपन्नाने चीनच्या झांग शुआईसह खेळताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांना दुसऱ्या फेरीत चाल मिळाली. बोपन्ना-शुआई यांचा सामना टेलर टाउनसेंड (अमेरिका) आणि ह्यूगो निस (मोनाको) यांच्याविरुद्ध होता. मात्र, ही जोडी कोर्टवर उतरलीच नाही आणि बोपन्ना-शुआई यांचा पुढील फेरीत प्रवेश झाला. बोपन्ना-शुआई यांनी ख्रिस्टिना म्लादेनोविच (फ्रान्स) आणि इवान डोडिक (क्रोएशिया) यांचा ६-४, ६-४ असा पराभव करत आपल्या मोहिमेला सुरुवात केली होती.