ऑस्ट्रेलियन ओपन : सबालेंका सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 05:56 IST2026-01-30T05:56:28+5:302026-01-30T05:56:53+5:30
Australian Open: दोन वेळा विजेतेपद पटकावणारी मानांकित अरिना सबालेंकाने एलिना स्वितोलिनाचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन : सबालेंका सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत
मेलबर्न - दोन वेळा विजेतेपद पटकावणारी मानांकित अरिना सबालेंकाने एलिना स्वितोलिनाचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
अंतिम फेरीत तिचा सामना एलिना रिबाकिनाशी होईल. २०२३ च्या अंतिम फेरीतही हेच दोन खेळाडू आमनेसामने आले होते. दुसरीकडे, रिबाकिनाने सहाव्या मानांकित जेसिका पेगुलाचा ६-३, ७-६ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. या लढतीबद्दल रिबाकिना म्हणाली, ‘२०२३ मध्ये सबालेंकाविरुद्धचा सामना शानदार होता. त्यावेळी तिने माझ्यापेक्षा चांगला खेळ केला आणि विजेतेपद जिंकले. मला आशा आहे की, यावेळी मी अधिक चांगला खेळ करू शकेन.’ दरम्यान, सबालेंकाने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. ओपन युगात इव्होन गुलागाँग आणि मार्टिना हिंगीस यांच्यानंतर सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या एकेरीची अंतिम फेरी गाठणारी ती तिसरी महिला खेळाडू ठरली आहे.
इतिहास रचण्यासाठी जोकोविच सज्ज
मेलबर्न - टेनिसच्या इतिहासात यशस्वी असलेला नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या उपांत्य फेरीत यानिक सिन्नरविरुद्ध कामगिरी करण्यास कटिबद्ध असून, तो सध्या इतिहास रचण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
जोकोविचला त्या काळाशी तुलना करण्यास सांगण्यात आले, जेव्हा त्याने टेनिस विश्वात पाऊल ठेवले होते आणि त्या वेळी रॉजर फेडरर व राफेल नदाल अव्वल होते. आता सिन्नर आणि कार्लोस अल्काराझ यांनी गेल्या दोन हंगामांपासून त्याला कोणतेही ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्यापासून रोखले आहे. यासंदर्भात पत्रकाराने त्याला पाठलाग करण्याबाबत प्रश्न विचारला होता. यावर जोकोविचने प्रश्नार्थक सुरात म्हटले, “मी यानिक आणि कार्लोसचा पाठलाग करत आहे? कोणत्या अर्थाने? मी नेहमीच पाठलाग करणारा खेळाडू राहिलो आहे.”
तो पुढे म्हणाला, हे थोडे अपमानास्पद वाटते की, तुम्ही त्या काळातील घटनांकडे दुर्लक्ष करत आहात, तुमच्या मते मी राफा आणि रॉजरचा पाठलाग करणे सुरू केले होते आणि आता कार्लोस व यानिकचा पाठलाग करत आहे. १५ वर्षांचा असा काळ होता जेव्हा मी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये माझा दबदबा कायम ठेवला होता. जोकोविचने स्पष्ट केले की, हे योग्य दृष्टिकोनातून पाहणे महत्त्वाचे आहे. मी स्वतःचा इतिहास रचत आहे.