Australian Open: जोकोविच तिसऱ्या फेरीत, सेरेना विलियम्सची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:20:57+5:302021-02-11T04:21:38+5:30
Australian Open: तियाफोईयाआधी जगातील नंबर वन खेळाडूविरुद्ध कधीही खेळला नव्हता आणि त्याने कधीही अव्वल पाचमध्ये समाविष्ट खेळाडूला नमवले नव्हते. मात्र, तो जोकोविचविरुद्ध दुसरा सेट जिंकण्यात यशस्वी ठरला.

Australian Open: जोकोविच तिसऱ्या फेरीत, सेरेना विलियम्सची आगेकूच
मेलबोर्न : अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत अमेरिकेच्या फ्रांसिस तियाफोई याला नमवले. महिला गटात सेरेना विलियम्सदेखील तिसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.
तियाफोईयाआधी जगातील नंबर वन खेळाडूविरुद्ध कधीही खेळला नव्हता आणि त्याने कधीही अव्वल पाचमध्ये समाविष्ट खेळाडूला नमवले नव्हते. मात्र, तो जोकोविचविरुद्ध दुसरा सेट जिंकण्यात यशस्वी ठरला. जोकोविचने २३ वर्षीय तियाफोईला चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-३, ६-७, ७-६, ६-३ असे पराभूत केले. मात्र, ही लढत जिंकण्यासाठी जोकोविचला साडेतीन तासांपर्यंत घाम गाळावा लागला.
अन्य लढतीत अमेरिकन ओपनचे विजेतेपद पटकावणारा डोमेनिक थीमने डोमेमीनिक कोफर याचा ६-४, ६-०, ६-२ असा पराभव केला. तीन वेळेसचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन आणि २०१४ चा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता स्टेन वावरिंका याने पाचव्या सेटच्या टायब्रेकमध्ये मोठी आघाडी आणि पुन्हा तीन मॅच पॉइंट गमावले. त्यामुळे त्याला मार्टन फुकसोविचविरुद्धची लढत ५-७, १-६, ६-४, ६-२, ६-७ असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत १० व्या मानांकित सेरेनाने दुसऱ्या फेरीत निना स्टोजानोविच हिचा ६-३, ६-० असा पराभव केला. तथापि, सेरेनाची मोठी बहीण व्हीनस विलियम्सला पराभवाचा सामना करावा लागला. तिला सारा इरानी हिने ६-१, ६-० असे नमवले. दुखापतीनंतर पुनरागमन करणारी माजी अमेरिकन ओपन चॅम्पियन बियांका आंद्रेस्क्यू हिला दुसऱ्या फेरीत तैवानच्या सीह सू-वेई हिने ६-३, ६-२ असे पराभूत केले. आठ वर्षांत प्रथमच ग्रँडस्लॅम खेळणाऱ्या कॅनडाच्या रेबेका मारिनो हिला १९ व्या मानांकित मार्केटा वांद्रोसोवा हिने ६-१, ७-५ असे नमवले. अमेरिकेची २० वर्षीय आन ली हिने एलिज कॉर्नेट हिच्यावर ६-२, ७-६ असा विजय मिळवत सलग दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मजल मारली.
बोपन्नाचे दुहेरीत आव्हान संपुष्टात
रोहन बोपन्ना आणि बेन मॅकलाचलन या जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्याच लढतीत जी सुंग नॅम आणि मिन क्यू सोंग या जोडीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभवाबरोबरच बोपन्नाचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
बोपन्ना आणि जपानचा त्याच्या जोडीदाराला कोरियाची वाईल्डकार्डप्राप्त जोडीविरुद्ध १ तास व १७ मिनिटांत ४-६, ६-७ असा पराभव पत्करावा लागला. कठोर विलगीकरणामुळे कोर्टवर जास्त सराव न करता आल्याने बोपन्नाला लय मिळवण्यात अडचण आली.
मॅकलाचलन यालादेखील सूर गवसला नाही. याची किंमत या जोडीला मोजावी लागली. बोपन्नाने विलगीकरणाच्या १४ दिवसांपर्यंत आपल्या खोलीत राहिला आणि ३० जानेवारी रोजी त्याला कोर्टवर उतरण्याची परवानगी मिळाली होती. या स्पर्धेत भारताचे आव्हान आता पुरुष दुहेरीत दिविज शरण आणि महिला दुहेरीत पदार्पण करणाऱ्या अंकिरा रैना यांच्या रुपाने जिवंत आहे.