एटीपी फायनल्स टेनिस: अलेक्झांडर झ्वेरेव उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 01:44 IST2019-11-17T01:43:52+5:302019-11-17T01:44:02+5:30
नदाल, फेडरर स्पर्धेबाहेर

एटीपी फायनल्स टेनिस: अलेक्झांडर झ्वेरेव उपांत्य फेरीत
लंडन : गतविजेता अलेक्झांडर झ्वरेव याने निर्णायक सामन्यात डेनिल मेदवेदेवचा पराभव करत एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी स्पेनच्या राफेल नदालचे आव्हान संपुष्टात आले. त्याने आतापर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. दुसरीकडे, सहावेळचा विजेता दिग्गज रॉजर फेडरर उपांत्य फेरीत पराभूत झाला.
नदालने स्टेफानोस सिटसिपासविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर ६-७ (४/७), ६-४, ७-५ असा विजय मिळवला. मात्र, यानंतरही त्याचे स्पर्धेतील भवितव्य झ्वेरेव विरुद्ध मेदवेदेव या सामन्यावर होते. झ्वरेवने मेदवेदेवला ६-४, ७-६ (७-४) असे नमविले. सिटसिपासने यापूर्वीच अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता. ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपासने शनिवारी रात्री उपांत्य फेरीत खळबळजनक निकाल लावताना दिग्गज फेडररचे आव्हान ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले. सिटसिपासने आपल्या पहिल्याच प्रयत्नात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. (वृत्तसंस्था)
नदालचे एटीपी फायनल्स जेतेपदाचे हे स्वप्न यंदाही अधुरे राहिले. यानंतरही त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर कब्जा केला. दुखापतीचा सामना केल्यानंतर नदालने लंडनमध्ये सुरुवात केली.
स्पर्धेत त्याची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात तो पराभूत झाला होता. त्यानंतर नदालने डेनिल मेदवेदेव आणि स्टेफनोस सिटसिपास यांना पराभूत केले. मात्र हा निकाल त्याला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पुरेसा ठरला नाही. सर्बियाचा नोव्हाक जोकोविचही उपांत्य फेरी गाठू न शकल्याने नदालचे अव्वल स्थान निश्चित झाले. पाचव्यांदा नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.