‘एआयटीए खेळाडूंच्या बाजूने नव्हते’, महेश भूपतीने व्यक्त केली निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 04:12 IST2019-11-29T04:12:23+5:302019-11-29T04:12:49+5:30
‘डेव्हिस चषक लढतीसाठी पाकिस्तान दौऱ्याबाबत खेळाडूंनी चिंता व्यक्त केली त्यावेळी टेनिस महासंघ व सरकारने त्यांना अधांतरी सोडले होते,’ असा आरोप माजी कर्णधार महेश भूपतीने गुरुवारी केला.

‘एआयटीए खेळाडूंच्या बाजूने नव्हते’, महेश भूपतीने व्यक्त केली निराशा
मुंबई : ‘डेव्हिस चषक लढतीसाठी पाकिस्तान दौऱ्याबाबत खेळाडूंनी चिंता व्यक्त केली त्यावेळी टेनिस महासंघ व सरकारने त्यांना अधांतरी सोडले होते,’ असा आरोप माजी कर्णधार महेश भूपतीने गुरुवारी केला.
राष्टÑीय महासंघाने मला निलंबित करण्यासाठी जी पद्धत अवलंबली त्यातून मी अद्याप सावरलो नसल्याचे सांगून भूपती म्हणाला, ‘गेल्या दोन दशकापासून एआयटीएच्या वागणुकीने मी मुळीच आश्चर्यचकित नाही. पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून दोन्ही देशात तणाव आहे. अनेक वर्षांपासून कुठल्याही संघाने खेळासाठी त्या देशाचा दौरा केला नसताना एआयटीए खेळाडूंवर तेथे खेळण्यास दडपण आणत आहे.’
‘जगात कुठेही पाकला पराभूत करु’
भारतीय क्रिकेट संघावर पाक दौरा करण्याची वेळ आली असती तर अनेक खासदारांनी संसदेत आवाज उठवला असता. टेनिसबाबत असे करण्यासाठी कुणालाही वाटले नाही. टेनिसचे भारतात किती महत्त्व आहे, हे यावरुन सिद्ध झाल्याचे मत भूपतीने व्यक्त केले. पाकविरुद्ध भारत सहज जिंकेल, असा त्याने दावाही केला. तो म्हणाला,‘ भारताला जगात कुठेही पाकला नमविताना त्रास जाणवणार नाही. कुठेही खेळलो तरी पाकला हरवूच.’