तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:32 IST2025-12-31T11:32:34+5:302025-12-31T11:32:56+5:30
आता हॅकर्सनी सर्वसामान्यांची बँक खाती रिकामी करण्यासाठी एक नवी आणि धक्कादायक पद्धत शोधली आहे.

तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
डिजिटल युगात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसागणिक वाढत चालले आहेत. आता हॅकर्सनी सर्वसामान्यांची बँक खाती रिकामी करण्यासाठी एक नवी आणि धक्कादायक पद्धत शोधली आहे. सरकारी एजन्सी 'इंडियन सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटर'ने नुकताच 'USSD कॉल फॉरवर्डिंग स्कॅम'बाबत धोक्याचा इशारा दिला आहे. यामध्ये केवळ एका चुकीच्या कोडमुळे तुमच्या फोनवर येणारे सर्व कॉल्स आणि मेसेज हॅकर्सकडे जाऊ शकतात. मात्र, घाबरण्याचे कारण नाही; तुम्ही एका सोप्या युक्तीने तुमचा फोन सुरक्षित आहे की नाही, हे तपासू शकता.
काय आहे हा नवा स्कॅम?
स्कॅमर्स सामान्य लोकांना फोन करून गोड बोलून किंवा काही आमिष दाखवून एक विशिष्ट USSD कोड डायल करायला सांगतात. हा कोड डायल करताच तुमच्या नंबरवर येणारे महत्त्वाचे कॉल्स आणि ओटीप परस्पर हॅकरच्या नंबरवर फॉरवर्ड होतात. याचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या बँक खात्यात शिरकाव करतात आणि काही क्षणात खाते रिकामे करतात.
कसे तपासाल तुमचे स्टेटस?
कसे तपासाल तुमचे स्टेटस?तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही किंवा तुमचे कॉल्स फॉरवर्ड होत आहेत का, हे तपासणे अतिशय सोपे आहे.
- सर्वात आधी तुमच्या फोनचे 'डायलर' (जिथून तुम्ही नंबर लावता) ओपन करा.
- त्यात *#21#* हा कोड टाइप करा आणि कॉलचे बटण दाबा.
- काही सेकंदात स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. जर तिथे प्रत्येक सेवेसमोर 'Not Forwarded' असे लिहिले असेल, तर तुमचा फोन सुरक्षित आहे.
- मात्र, जर एखाद्या सेवेसमोर कोणताही अज्ञात मोबाईल नंबर दिसत असेल, तर समजून जा की तुमचे कॉल्स किंवा मेसेज चोरून ऐकले किंवा वाचले जात आहेत.
हॅकिंगपासून सुटका कशी मिळवाल?
जर तुम्हाला तुमच्या फोनवर कॉल फॉरवर्डिंग सक्रिय असल्याचे आढळले, तर घाबरून न जाता खालील कृती करा:
- पुन्हा डायलरमध्ये जा आणि ##002# हा कोड डायल करा.
- हा कोड डायल करताच तुमच्या फोनवरील सर्व सक्रिय कॉल फॉरवर्डिंग सेवा त्वरित बंद होतील. यामुळे हॅकर्सचा तुमच्या फोनवरील ताबा सुटेल आणि तुम्ही सुरक्षित व्हाल.
कायम सुरक्षित राहण्यासाठी 'हे' करा
सायबर तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक युजरने महिन्यातून किमान एकदा तरी हे स्टेटस तपासायला हवे. तसेच, अनोळखी व्यक्तीने फोनवर सांगितलेला कोणताही कोड कधीही डायल करू नका. तुमची ही एक छोटीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकते.