एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 06:24 IST2026-04-11T06:24:12+5:302026-04-11T06:24:43+5:30
चालण्यात अडथळा येण्यापूर्वीच मिळणार इशारा; फ्रीझिंग ऑफ गेटच्या जोखमीची लवकर पटणार ओळख

एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने पार्किन्सन आजारामध्ये होणाऱ्या फ्रीझिंग ऑफ गेट (एफओजी) समस्येचे भाकीत करण्यासाठी नावीन्यपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यामध्ये पार्किन्सनमधील सर्वात कठीण गुंतागुंत मानल्या जाणाऱ्या फ्रीझिंग ऑफ गेटच्या जोखमीची लवकर ओळख पटवण्यासाठी स्वस्त आणि सुलभ डिजिटल साधन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
जसलोकच्या न्यूरोसर्जरी विभागाचे संचालक डॉ. परेश दोशी या उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. तसेच, फ्रान्समधील पॅरिस ब्रेन इन्स्टिट्यूटच्या फंक्शनल न्यूरोसर्जरीमधील जागतिक स्तरावर प्रख्यात तज्ज्ञ डॉ. कॅरीन कराची या देखील त्यांच्यासोबत या प्रोजेक्टमध्ये सामील असून १ जागतिक पार्किन्सन दिनानिमित्त (११ एप्रिल) या प्रोजेक्टची अधिकृत ओळख करून दिली जाईल.
बहुतांश पद्धती या क्लिनिकल स्कोअरिंग, इमेजिंग बायोमार्कर्स किंवा बायोकेमिकल चाचण्यांवर अवलंबून आहेत, ज्या अनेकदा महागड्या असतात आणि केवळ विशेष संशोधन केंद्रांपुरत्याच मर्यादित असतात. तसेच, यांपैकी कोणतेही साधन वैयक्तिक स्तरावर ठामपणे सांगू शकत नाही की, एखाद्या रुग्णाला आजारादरम्यान पुढे जाऊन फ्रीझिंग ऑफ गेटची समस्या निर्माण होईल किंवा नाही. यामध्ये एआय-आधारित यंत्रणा एफओजी होण्याची शक्यता आणि त्यासाठी लागणारा संभाव्य वेळ या दोन्ही गोष्टींचा अंदाज वर्तवून सध्याच्या संशोधनातील त्रुटी दूर करते. एफओजी सुरू होण्यापर्यंतचा काळ हे वैशिष्ट्य जगात पहिल्यांदाच अभ्यासले जात आहे.
फ्रीझिंग ऑफ गेट म्हणजे काय?
पार्किन्सन आजाराने पीडित रुग्णांना अनेकदा चालताना अचानक अडथळा जाणवतो किंवा चालणे सुरू ठेवणे कठीण होते. या स्थितीला रुग्ण त्यांचे पाय जमिनीला चिकटल्यासारखे वाटत असल्याचे सांगतात. याला फ्रीझिंग ऑफ गेट असे म्हणतात. यामुळे रुग्ण वारंवार पडतात, त्यांना जखमा होतात. पार्किन्सन असलेल्या ८० टक्के रुग्णांमध्ये ही समस्या दिसून येते. ही समस्या इतकी गंभीर आणि व्यापक असूनही सध्या यावर कोणताही खात्रीशीर उपचार उपलब्ध नाही.
असे होणार निदान
ही यंत्रणा अत्यंत साध्या, पण व्यापक स्तरावर वापरता येण्याजोग्या आराखड्यावर आधारित आहे, जी रुग्णाच्या चालण्याच्या पद्धतीचे सामान्य व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे विश्लेषण करते. यामध्ये कॉम्प्युटर व्हिजन व मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून चालण्यातील आणि शरीराच्या समन्वयातील सूक्ष्म बदल ओळखले जातील, जे भविष्यातील फ्रीझिंग एपिसोड्सचे संकेत देऊ शकतात. हा दृष्टिकोन कोणत्याही विशेष वीअरेबल डिवाईसेसवर किंवा महागड्या निदानावर अवलंबून नसल्यामुळे सर्व हॉस्पिटल्स, ओपीडी आणि टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मवर अगदी मर्यादित संसाधने असलेल्या ठिकाणीही वापरता येईल.
जगभरातील पार्किन्सनच्या रुग्णांसाठी एफओजी मोठे आव्हान राहिले आहे. अल्झायमर संशोधनाप्रमाणे एफओजीसंदर्भातील संशोधन पार्किन्सन संशोधनातील आव्हानात्मक विषयांच्या केंद्रस्थानी आहे. आमच्या संस्थेत आम्ही नुकतेच नवीन प्रोग्रामिंग तंत्राद्वारे एफओजी समस्येवर उपाय शोधणारा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. हे संशोधन पार्किन्सन आजारातील सर्वात आव्हानात्मक समस्येचे निराकरणात उपयुक्त ठरेल.
-डॉ. परेश दोशी, संचालक न्यूरोसर्जरी