एआय पडेल का भारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 07:20 IST2025-02-16T07:20:31+5:302025-02-16T07:20:46+5:30

मुद्द्याची गोष्ट : सध्या एआयबाबत वेगवेगळे सर्व्हे केले जात आहेत. या अभ्यासांत थेट कर्मचाऱ्यांना सामील करून घेतले जात आहे. एआय माणसालाच हद्दपार करणार का, इथपर्यंत प्रश्न उपस्थित होत असताना एका अभ्यासात एआय कधीही माणसाची जागा घेऊ शकणार नाही, असा निष्कर्ष निघाला आहे.

Will AI be overwhelming? | एआय पडेल का भारी?

एआय पडेल का भारी?

मुद्द्याची गोष्ट : सध्या एआयबाबत वेगवेगळे सर्व्हे केले जात आहेत. या अभ्यासांत थेट कर्मचाऱ्यांना सामील करून घेतले जात आहे. एआय माणसालाच हद्दपार करणार का, इथपर्यंत प्रश्न उपस्थित होत असताना एका अभ्यासात एआय कधीही माणसाची जागा घेऊ शकणार नाही, असा निष्कर्ष निघाला आहे.

पसीक’ या चिनी एआय चॅटबॉटने पदार्पणातच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करीत असलेल्या चॅटजीपीटीसारख्या दिग्गज खेळाडूंची विकेट काढली. अत्यंत कमी खर्चात तयार झालेल्या या एआय तंत्रामुळे अमेरिकेच्या शेअर बाजाराने मोठा आपटी खाल्ली. टॉपच्या कंपन्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ही तर फक्त एक झलक आहे. एआय तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यात असे कित्येक धक्कादायक प्रसंग येऊ शकतात. जितके विस्मयकारक परिणाम एआयच्या येण्याने दिसू लागले आहेत, तितकेच कंपन्यांच्या स्पर्धेतूनही दिसू लागतील, हे तितकेच खरे. ‘डीपसीक’च्या आगमनामुळे एआय क्षेत्राची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

कोणत्याही क्षेत्रात काम करताना काही मानवी कौशल्ये अत्यंत महत्त्वाची असतात. नैतिक मूल्यांवर आधारित निर्णय क्षमता, माणसांचा संग्रह आणि संबंधांची जपणूक, बुद्धिमत्तेला भावनांचा स्पर्श असणे आणि सहानुभूतीची जाणीव ही ती कौशल्ये होत. आजच्या काळात ही काैशल्ये महत्त्वाची आहेतच, पण पुढे येऊ घातलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) बोलबाला असलेल्या काळातदेखील ही कौशल्ये तितकीच महत्त्वाची असतील. एआयच्या काळात तर व्यक्तिगत स्तरावर नव्याचा स्वीकार आणि सर्जनशीलता ही काैशल्ये असणे खूप आवश्यक असेल.

सर्जनशीलता, नेतृत्त्व, शिकण्याची लालसा, विश्वास आणि परस्पर सहकार्य ही मानवाची पाच प्रमुख तत्त्वे आहेत. या तत्त्वांवरच आगामी एआयच्या काळात उद्योग-व्यवसाय आणि तेथे काम करणारे लोक टिकाव धरू शकणार आहेत. सध्या काळाची पावले ओळखून जे लोक एआयचा अर्थपूर्ण वापर करीत आहेत आणि वेगवेगळे प्रयोग करीत आहेत, त्यांचा अलीकडेच एक सर्व्हे करण्यात आला. एआयमुळे अधिक जबाबदारीने काम करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागते, यावर ९३ टक्के लोकांनी सहमती दर्शवली आहे. ‘वर्कडे’ या कंपनीसाठी ‘हॅनोव्हर रिसर्च’ने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हा सर्व्हे केला. उत्तर अमेरिका, आशिया - पॅसिफिक, युरोप, मध्य-पूर्व आणि आफ्रिका खंडातील २२ देशांमधील २,५०० पूर्णवेळ कर्मचारी या सर्व्हेत सामील झाले होते. एआयचा उदोऊदो होणाऱ्या काळातही मानवी हस्तक्षेप, मानवी स्पर्शाशिवाय कोणतेही काम पूर्णत्वास जाणे कठीण आहे, असा निष्कर्ष या सर्व्हेतून पुढे आला आहे. मानवी क्षमतांचा विचार करता एआय हे भविष्यासाठी वरदान ठरू शकते, यात शंका नाही. मात्र, त्याचा वापर कसा केला जातो, यावर बरेच अवलंबून असेल. परस्पर संवाद, सहानुभूती, सृजनशीलता, मूल्ये, निर्णयक्षमता व नेतृत्व या बाबतीत एआय कधीही मानवाला मात देऊ शकणार नाही.

एआयच्या प्रभावी वापरासाठी कंपन्यांनी काय करावे?

मानवी भावनाकेंद्रित नेतृत्व असावे. सहानुभूती, सृजनात्मकता आणि मूल्यांवर आधारित निर्णयक्षमता विकसित करण्यावर भर द्यावा.

मानवी परस्परसंबंध निकोप असावेत. एआय आणि मानव यांच्यातील संवाद, समन्वय आणि संपर्क असा असावा की दोघांनाही परस्परांच्या क्षमतांचा पूर्ण वापर करता येईल.

कौशल्य विकासावर अधिक भर हवा. कर्मचाऱ्यांमधील सामान्य कौशल्ये आणि एआय-केंद्रित कौशल्ये यांना चालना देऊन त्यात आपले मनुष्यबळ पारंगत केले पाहिजे.

पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चितीवर भर असावा. एआय अल्गोरिदम आणि निर्णयप्रक्रिया नेहमी पारदर्शक आणि स्पष्टीकरण देता येईल, अशी असावी.

एआय नेमके काय करतो?

संशोधकांच्या असे निदर्शनास आले आहे की, एआय दोन प्रकारे सृजनशीलता वाढवण्यास मदत करतो.

एआय माणसाला नेहमीच्या कामापासून मुक्तता देतो. ही कामे एआय अधिक क्षमतेने आणि वेगाने करू शकतो.

एआय हा सृजनात्मक सहकारी आहे. नव्या कल्पनांना वाव मिळेल, अशा गोष्टी त्वरेने ओळखणे आणि त्यांना चालना देणे.

काय करू शकत नाही?

माणूस जे करू शकतो, ते एआय करू शकत नाही, अशी प्रमुख पाच मानवी कौशल्ये आहेत. ती कधाही एआय आत्मसात करू शकणार नाही.

बुद्धिमत्तेला भावनांचा स्पर्श असणे आणि सहानुभूती

माणसांचा संग्रह आणि संबंधांची जपणूक

नैतिक मूल्यांवर आधारित निर्णय क्षमता

सांस्कृतिक संवेदनशीलता आणि स्वीकारार्हता

काय करण्याची गरज आहे?

माहिती, आकडेवारी यांचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहित करावे.

एआय तंत्राच्या प्रभावी वापरासाठी क्षमतांनुसार विभागणी करावी.

अधिक महत्त्वाच्या आणि कौशल्याच्या कामी मनुष्यबळाचा वापर करणे.

Web Title: Will AI be overwhelming?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.