तुमच्या नावाचं सीम कार्ड कोण वापरतंय?; सुरक्षेसाठी जाणून घ्या, असं चेक करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 18:52 IST2024-03-19T18:48:39+5:302024-03-19T18:52:06+5:30
स्कॅमर्स किंवा गुन्हेगार कुणा दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड घेऊन त्याचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी करतात.

तुमच्या नावाचं सीम कार्ड कोण वापरतंय?; सुरक्षेसाठी जाणून घ्या, असं चेक करा
मुंबई - डिजिटल इंडियात आणि स्मार्टफोनच्या जमान्यात सीम कार्ड ही प्रत्येकाची गरज आहे. कारण, प्रत्येक हाती मोबाईल आल्याने सीम कार्ड घेतल्याशिवाय तुमचा मोबाईल सुरुच होऊ शकत नाही. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (TRAI) ने सीम कार्डच्या अनुषंगाने एक नियम बदलला आहे. त्यानुसार, सीम कार्ड स्वॅप केल्यानंतर त्याच सीम कार्डला ७ दिवसांपर्यंत दुसऱ्या कंपनीत पोर्ट केले जाऊ शकत नाही. १ जुलैपासून हा नवीन नियम लागू होणार आहे. दरम्यान, तुमच्या नावावरही एकपेक्षा जास्त सीम असू शकतात. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या नावार किती सीम कार्ड आहेत.
स्कॅमर्स किंवा गुन्हेगार कुणा दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड घेऊन त्याचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी करतात. देशविरोधी कारवाई किंवा सायबर फ्रॉडसाठीही या सीम कार्डचा वापर केला जातो. त्यामुळे, तुमच्या नावाचे सीम कार्ड कोण वापरतंय का, हेही खात्री करुन घ्यायला हवी. तुम्हाला तुमच्या सीम कार्डचा वापर कोण करतंय हे जाणून घेण्यासाठीची आवश्यक ती माहिती या लेखातून मिळेल. तुमच्या आधार कार्डचा वापर करुन किती सीम कार्ड वापरले जात आहेत, हे तुम्हाला सहजपणे कळू शकेल.
संचार साथी पोर्टरवर जाऊन तुम्ही ही माहिती घेऊ शकता. (tafcop.sancharsaathi.gov.in)
tafcop.sancharsaathi.gov.in किंवा sancharsaathi.gov.in
या वेबसाईटवर जाऊन Citizen Centric Services बटणावर क्लीक करा. त्यानंतर, Know Your mobile connection यावर क्लीक करा. इथून तुम्हाला मोबाईल कनेक्शन संदर्भात तुम्हाला माहिती मिळेल. येथे तुम्हाला तुमचा १० अंकी मोबाईल क्रमांक एंटर करावा लागेल. त्यानंतर, तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी दिल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर मोबाईल क्रमांकाची डिटेल्स येईल. त्यानुसार, तुमच्या नावावर किती सीम कार्ड सुरू आहेत, ते तुम्ही पाहू शकता.
दरम्यान, या माहितीतून तुम्ही वापरत नसलेल्या किंवा तुम्ही सध्या वापरत नसलेला तुमचा मोबाईल नंबर सुरू असल्यास तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता. त्यानंतर, तो मोबाईल क्रमांक बंद करू शकता.